नवी मुंबई : 85 एएसआय झाले पीएसआय | पुढारी

नवी मुंबई : 85 एएसआय झाले पीएसआय

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या 85 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना शुक्रवारी 13 मे रोजी पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय आस्थापन मंडळाने घेतला.

गृह विभागाने फेबु्रवारीत पोलीस नाईक हे पद रद्द केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा ही पदोन्नती कर्मचार्‍यांना मिळाली. यामुळे आता पोलीस हवालदार असलेल्या कर्मचार्‍यांना लवकरच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिली जाणार आहे.

गृह विभागाने 25 फेबु्रवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस दलातील पोलीस नाईक हे पद रद्द केले. आता पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संवर्गातील पदांना मान्यता दिली होती. गृह विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक यांनी त्यांच्या स्तरावर 8 मार्च रोजी सुकाणू समिती गठीत केली. या सुकाणू समितीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक यांच्यासोबत मार्च महिन्यांत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन बैठका घेतल्या होत्या.

याबैठकीत पोलीस दलात 30 वर्षे सेवा पूर्ण, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण आणि पोलीस उपनिरिक्षक पदाचे वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांची पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी, 13 मे रोजी आस्थापन मंडळाची बैठक घेतली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पदोन्नतीस पात्र असलेल्या कर्मचार्‍यांची प्रशासनाकडून माहिती मागवली. त्यानुसार 85 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.

Back to top button