Friendship Day Special : मुलगा आणि मुलगी मित्र! कुछ तो गडबड है, असंच का वाटतं? | पुढारी

Friendship Day Special : मुलगा आणि मुलगी मित्र! कुछ तो गडबड है, असंच का वाटतं?

सोनाली जाधव : Friendship Day Special : त्या दोघांना पाहून आसपासचे म्हणू लागले “हल्ली ते जरा जास्तच एकत्र असतात, काय भानगड सुरु आहे की काय?” साधं बोलताना दिसलं, अगदी एकत्रित चालताना दिसलं तरी लोकांची कुजबुज कानावर पडू लागली.

जणू त्यांच प्रेम प्रकरणच सुरु झालंय अन् हा आता गुन्हाच घडलाय अशा लोकांच्या नजरा कायम त्यांच्या नात्याला भेदू लागल्या. ही चर्चा त्या दोघांच्या घरा पर्यंत पोहोचली. अन् झालं व्हायचं तेच. त्याचं नातं थांबलं, त्यावर बंधनं आली. Friendship Day Special artical

अहो, कायच नव्हतं त्यांच तसं; निखळ मैत्रीच होती फक्त पण ते ही अनेकांना रुचलं नाही.

मुलगा-मुलगी दिसली की लोकं स्वतःची गृहितके मांडून सुरु करतात आणि सुंदर, प्रामाणिक मैत्रीच्या नावाला ही बट्टा लावला जातो.

मैत्रीचं नातं म्हंटल की नात्यात प्रेम, हक्क, विश्वास, भांडण, रागावणं, चिडवण, केअरिंग, शेअरिंग आलं. पण आजही आपल्याकडे मुलगा आणि मुलगीच्या मैत्रीच्या नात्याला संकुचित नजरेने पाहणारे दिसतील.

Friendship Day : भुवया उचंवणाऱ्यांची संख्या तुरळक असली तरी ती खटकणारी

एक मुलगा एक मुलगी कुठेतरी पाहिली की भुवया उचंवणाऱ्यांची संख्या तुरळक असली तरी ती खटकणारी आहे. “काय मग एकमेकांना डेट करताय वाटतं”, “ती बाई पोरांच्या घोळक्यातचं असते”, “कुछ तो गडबड है”, असंच काहीसं बऱ्याच जणांनी ऐकल असेल, म्हंटलही असेल. मुला मुलीला बाहेर फिरणं, गप्पा मारणे गैर वाटत नसले तरी अशा मैत्रिकडे पाहण्याच्या पूर्वग्रह दूषित नजरा दिसतील.

मैत्रीचे अनेक मानवी पैलू आहेत ती वयाची अट तोडून जमणारी लहान मूल आणि आज्जीची मैत्री, जाती-पातीचे पाश तोडून टाकणारा मैत्रिभाव, समविचारी मुलगा-मुलगा, मुलगी-मुलगी, मुलगा-मुलगी असे बरेच पैलू दिसतील.

पण मुलगा-मुलगी अशी भिन्नलिंगी मैत्री म्हंटल की आश्चर्य मिश्रित नाराजीचा सुर कुठेतरी उमटलेला दिसतोच. कोणत्यातरी कॅफेत, बागेत मुलगा मुलगी दिसली तरी “यांचं काहीतरी लफडं असणार” म्हणत भुवया उंचवणाऱ्यांची नजर खटकणारी वाटते.

थोडक्यात आजही लैंगिकतेपलिकडच्या मित्रत्वाची रुजवत नाही.

लैंगिकते पलिकडे जाऊन एखाद भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निखळ नातं असेल पण अनेकवेळा या संकुचित मानसिकतेमुळे समस्यांना सामोरे जावं लागत.

एक मुलगी एका मुलगीची किंवा एक मुलगा इतर मुलांशी जिवलग मैत्री जेवढी सहजरीत्या घेतली जाते, त्याच सहजगतीने आपण एका मुलाची आणि एका मुलीची मैत्री आपण सहजरीत्या अजूनही घेत नाही.

Friendship Day : मुलगा मुलगी दिसली तरी आमच्या संशयाच्या पाली चुकचुकायला लागतात

कुठेतरी मुलगा मुलगी दिसली तरी आमच्या संशयाच्या पाली चुकचुकायला लागतात.

मैत्री तीही एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांच्या मध्ये न पचणारी बाब वाटते.

त्या दोघांच्याही मध्ये निखळ नातं असू शकते हे आम्हाला न पटणारी गोष्ट.

अजूनही या निखळ नात्याला आम्ही आमच्या संकुचित मानसिकतेने लैंगिक, आकर्षण, अनैतिकचे गालबोट लावून दूषित केलंय.

पण या नात्यात मोकळेपणा आणि मानसिक प्रगल्भता आली कि मानवी नात्यातील या निखळ नात्याच्या लक्ष्मणरेषा नक्की संपुष्टात येतील.

पण हे मात्र खरं मैत्री ती कोणाच्यातही असो तिथे अटीतटी, भांडण, रुसणं-फुगणं, चेष्टा-मस्करी बरंच काही असतं.

हा निखळ मैत्रिभाव अमूल्य क्षणांचा कर्ता असतो, मनाला उभारी देणारा असतो, पडत्या काळात सावरणारा, आनंदी क्षणांची वाटेकरी असतो.

हा मैत्रीचा मर्मबंध जाणून घेतला तर मानवी नात्यांच्या पैलू तील या निखळ मैत्रीचा सहजपणा आपल्याला नक्की समजून घेता येईल.

बरं तुम्हाला तो “एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते” ‘मैने प्यार किया’ फिल्म मधील हा डायलॉग आठवतोय का?

आठवला ना!!! पण काही डायलॉग बदलायला हवेत ना काळाच्या ओघात, “एक लडका और एक लडकी सच्चे दोस्त भी हो सकते हैं” हा छान आहे ना डायलॉग.

सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

Back to top button