कोयना धरण निर्मितीनंतर ५९ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत | पुढारी

कोयना धरण निर्मितीनंतर ५९ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : कोयना परिसरातील शंभर वर्षांचे तर धरण निर्मितीनंतर 59 वर्षांतील कमी काळात ज्यादा पाऊस व पाणी आवक यांचे सर्व विक्रम यावर्षी जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात मोडीत निघाले.

गतवर्षीच्या तुलनेत तब्बल अठराशे ते दोन हजार मिलिमीटर जादा पाऊस व 59.58 टीएमसी जादा पाण्याची आवक धरणात झाली आहे. तुलनात्मक यावर्षी धरणात 36.55 टीएमसी ज्यादा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या दरवाजातून विनावापर मोठ्या प्रमाणावर पाणी अद्यापही सोडण्यात येत आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात यापुढे केवळ 16.92 टीएमसी इतकाच पाणीसाठा सामावून घेतला जाऊ शकतो.

अद्यापही ऑगस्ट महिन्यातील पाऊस बाकी आहे. कोयना धरणाचे एक जून ते 31 मे असे तांत्रिक जलवर्ष असते. यापैकी दोन महिन्यांचा कालावधी संपला आहे.

पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 8.24 टीएमसी पाण्यावर 382.645 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

पूर्वेकडे सिंचनासाठी केवळ 0.40 तर पूरकाळात 3.63 टीएमसी पाण्यावर 17.314 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

वर्षभरासाठी पश्चिमेकडील वीज निर्मिती प्रकल्पांना 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. त्यापैकी आतापर्यंत 8.24 टीएमसी पाणी वापरल्याने आगामी दहा महिन्यांसाठी 59.26 टीएमसी पाणी कोटा शिल्लक आहे. सिंचनासाठी सरासरी 36 टीएमसी पाणीवापर होतो. त्यासाठीही येथे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

यावर्षी कोयना धरणावर अवलंबून असलेल्या निम्म्याहून अधिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांची पाण्यासाठी चिंता मिटली असली तरी पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीची चिंता बाकीच आहे. त्यामुळेच धरण व्यवस्थापन व प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कायमच आहे.

Back to top button