दिलीप वळसे-पाटील : फडणवीसांचा जबाबच घेतला; इतके रणकंदन कशासाठी? | पुढारी

दिलीप वळसे-पाटील : फडणवीसांचा जबाबच घेतला; इतके रणकंदन कशासाठी?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नाही, तर गोपनीय डेटा बाहेर गेला कसा, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यामुळे भाजपला इतके रणकंदन माजवण्याचे काहीच कारण नव्हते. केंद्रीय यंत्रणा काय आणि कसे काम करतात त्यावरही बोला, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी भाजपला लगावला.

गोपनीय कागदपत्रे व माहिती बाहेर कशी आली याची चौकशी सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पाच अज्ञात व्यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत 24 जणांचा जबाब घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याच्या द‍ृष्टीने फडणवीस यांचा जबाब आवश्यक होता. त्यासाठी त्यांची चौकशी झाली, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

राजकीय आरोप करण्याची भाजपला सवयच : आदित्य ठाकरे

आम्ही कधीही यंत्रणेचा गैरवापर करत नाही. फडणवीस यांची चौकशी न्यायप्रक्रिया पुढे नेण्यासाठी करण्यात आली. त्यामुळे चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचेे म्हणणे चुकीचे आहे. भाजपला राजकीय आरोप करण्याची सवयच लागली आहे. त्यांचे काम आरोप करणे आहे. आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर न देता आपली कामे करतो, असे प्रत्युत्तर युवा सेना अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना दिले.

तुमची ईडी नेत्यांना उचलून आत टाकते तेव्हा : भुजबळ

फडणवीस यांच्या घरी जाऊन पोलीस माहिती घेत आहेत; तर एवढा आरडाओरडा कशाला? ईडी आणि सीबीआय आमच्या नेत्यांना थेट उचलून नेते, जेलमध्ये टाकते. तरी आम्ही चौकशीला बोलावले की जातो. तुम्हाला एवढे राजकीय भांडवल करायचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. केवळ मुस्लिम आहे म्हणून नवाब मलिक यांचे नाव दाऊदशी जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काहीही झाले तरी राज्य सरकार पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीत कोणालाच विशेषाधिकार नसतो : संजय राऊत

काही लोक आणि राजकीय पक्ष स्वतःला नेहमी कायद्यापेक्षा मोठे समजतात. राज्यातील मंत्री आणि नेत्यांना केंद्रीय यंत्रणांनी चौकशीला बोलावले आणि ते हजर झाले. पण काही लोक चौकशीला बगल देऊन विशेषाधिकाराची भाषा करतात. लोकशाहीत कोणालाही असा विशेषाधिकार नसतो, असा हल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चढविला.

Back to top button