इलेक्ट्रिक बिघाडाने पेटतात 65 टक्के वाहने | पुढारी

इलेक्ट्रिक बिघाडाने पेटतात 65 टक्के वाहने

मुंबई ; राजेंद्रप्रसाद मसूरकर : आजकाल उन्हाळ्यातच नव्हे, तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही धावत्या कार किंवा कोणतेही धावते वाहन पेटण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. अलीकडेच कपडे आणि औषधे घेऊन जाणार्‍या मालट्रकला आग लागल्याची भीषण घटना हिंगोली परिसरात घडली. वाहन पेटले की, माणूस एक तर कंपनीला शिव्या घालतो किंवा इंजिनला दोष देतो. वाहन पेटण्याची कारणे तपासली तर लक्षात येईल की, अनेकदा इंजिन जबाबदार असेल तर त्याच पटीत वाहन चालवणाराही तितकाच जबाबदार असतो.

वाहनांना लागणार्‍या 60 ते 65 टक्के आगी या इलेक्ट्रिक बिघाडामुळे लागतात आणि 35-40 टक्के कारणांमध्ये मानवी दोषासह अन्य कारणे येतात. कार पेटण्यास जबाबदार कोण? इंजिन की चालक? या प्रश्नाचा दोन भागांत घेतलेला हा वेध तमाम कारचालकांना आणि वाहनचालकांनाही दिशा देणारा ठरावा.

इंजिनदादा इंजिनदादा काय करताय?

इंजिन हा कोणत्याही वाहनाचा दादा पार्ट म्हणून ओळखला जातो. इंजिन बिघडले तर सारेच बिघडले. त्यामुळे आधी इंजिनदादाची विचारपूस करूयात. हा दादा गरम झाला की, तो धोक्याचा इशारा समजावा. इंजिनदादा गरम का होतात, हे आधी अभ्यासले पाहिजे आणि लक्षातदेखील ठेवले पाहिजे.

इंजिन गरम होण्याची बहुतांश कारणे इंजिनच्या शीतकरण व्यवस्थेशी म्हणजेच कूलिंग सिस्टीमशी संबंधित असतात. रेडिएटरमध्ये मिसळावयाच्या कूलंटची पातळी कमी होणे, रेडिएटरमधले पाणी कमी होणे, वॉटर पंप आणि पंखा फिरवणारा पट्टा सैल होणे किंवा तुटणे ही झाली इंजिन गरम होण्याची प्राथमिक कारणे.

आजकालच्या वाहनांच्या इंजिनमध्ये पंखा फिरविण्यासाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्था असते, इंजिनचे तापमान विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊ लागताच पंखा आपोआप फिरू लागतो. त्यासाठी बसवलेेले स्विच निकामी झाल्यास पंखा फिरणे बंद होते. परिणामी, गाडीचे म्हणजेच इंजिनचे तापमान दर्शवणार्‍या टेम्परेचर गेजवरील काटा लाल पट्ट्यात जातो; मग बॉनेटच्या बाजूने वाफा येऊ लागतात.

वॉटर पंपाचा पट्टा म्हणजेच फॅन बेल्ट सैल झाल्यास अथवा तुटला, तर इंजिन गरम होऊ लागते. पट्ट्याचा ताण वेळच्या वेळी जुळवून घेणे, खराब झालेला, झिजलेला पट्टा वेळीच बदलणे हे उपाय केले, तर इंजिन गरम होणे टाळता येईल. रेडिएटरला जोडलेले पाण्याचे होजपाईप वाहनचालकांकडून दुर्लक्षित राहतात. या पाईपना चिरा पडल्या असतील तर ते बदला. जुन्या क्लिपा बदला.

रेडिएटरच्या झाकणाची स्प्रिंग कमजोर होणे, रबर वॉशर नरम पडल्यास आतल्या पाण्यावरचा दाब कमी होऊन ते लवकर तापून उकळू लागते. अशावेळी झाकण बदला. चालू गाडीत गरम रेडिएटरचे झाकण कुठल्याही परिस्थितीत लगेच उघडू नये, इंजिन अर्धा तास तरी थंड होऊ द्यावे.

रेडिएटर चोंदणे, त्याच्या नळ्यांना गळती लागणे या कारणांमुळेही इंजिन गरम होते. म्हणून रेडिएटरची स्वच्छता दर दोन वर्षांनी तरी करून घ्यावी.

* वाहनांना आगी लागण्याच्या 60 ते 65 टक्के घटनांमागे विजेच्या यंत्रणेतील दोष हे कारण असते.

* बॅटरी तपासा, ती बसविण्याच्या जागेवरचे तळाचे पत्रे खराब होण्याच्या मार्गावर असतील तर बदलून टाका. बॅटरी योग्यप्रकारे हुकने घट्ट करा. जुन्या व्यावसायिक वाहनांच्या बॅटर्‍या कधी कधी दोरी अथवा तारेने बांधलेल्या असतात, हे धोकादायक आहे. बॅटरी कलंडली तर आग लागू शकते.

* बॅटरी उतरल्यामुळे स्टार्टर लागत नसेल, तर दुसर्‍या गाडीच्या बॅटरीवरून वीजपुरवठा घेण्यात काही गैर नाही; पण त्यासाठी जंप वायर वापराव्यात. काही लोक चार्ज असलेली बॅटरी डाऊन बॅटरीवर उलटी धरून जादा वीजपुरवठा मिळवतात, अशावेळी उलट्या बॅटरीतील अ‍ॅसिड सांडून वाहन पेट घेऊ शकते.

* स्विच गरम होणे, दिवे लावल्यावर वायरी गरम होणे या दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी नव्हेत. कुरतडल्या गेलेल्या वायरवर कुठे तरी गळती झाल्याने, पेट्रोलचे थेंब पडून गाड्या पेटल्याची उदाहरणे आहेत.

* बरेच दिवस उभी असलेली गाडी वापरायला काढताना वायरिंग नीट तपासले पाहिजे.

Back to top button