

पुढारी ऑनलाईन डेस्क; पुढारी ऑनलाईन : कोकणसह कोल्हापूर, सांगली, सातारा येथे अतिवृष्टीने हाहाकार उडाला. आता येथील पूर ओसरत असताना पुन्हा एकदा कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने आज मंगळवार (२७ जुलै) रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
तसेच बुधवार (दि.२८ जुलै) देखील ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
तर महिन्याच्या अखेरीस ३० जुलैला रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर २९ आणि ३० जुलै रोजी रायगड, रत्नागिरीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तर ३० जुलैला पुणे, कोल्हापूर, सातारा येथील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मोठ्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी सतर्क रहावे यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. इशारा स्वरुपात रेड अलर्ट दिला जातो. तर ऑरेंज अलर्टचा अर्थ सतर्क असावे असा आहे. यलो अलर्टचा अर्थ लक्ष असावे असा आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे चार दिवस वाहतूक आणि जनजीवन ठप्प झाले. आता पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे पूर ओसरत आहे. पूर ओसरत असताना पुन्हा आता मुसळधार पावसाचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
हे ही वाचा :