थेट पाईपलाईन पुर्ण झाली असती …तर कोल्हापूर तहानलं नसतं

थेट पाईपलाईन पुर्ण झाली असती …तर कोल्हापूर तहानलं नसतं
Published on
Updated on

कोल्हापूर ः सतीश सरीकर :  शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंचगंगा व भोगावती नदीवरील उपसा केंद्रांना महापुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. परिणामी चार दिवस पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. थेट पाईपलाईन वेळेत पूर्ण झाली असती तर कोल्हापूर तहानलं नसतं, हे वास्तव आहे. वास्तविक 2016 मध्येच थेट पाईपलाईन योजना पूर्ण होऊन शहरवासीयांना पाणी मिळायला पाहिजे होते.

परंतु प्रत्यक्षात 2021 साल संपत आले तरीही अद्याप पाणी मिळालेले नाही. शहराच्या उशाला नदी वाहते; पण शहरवासीयांना प्यायला पाणी नसल्याचे वास्तव आहे. कोल्हापूरसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी तब्बल पाचशे कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. परंतु गेली सात वर्षे योजनेचे काम संथगतीने सुरू आहे.

…तर कोल्हापूर तहानलं नसतं!

2019 व 2021 या दोन महापुराचे अनुभव आता गाठीशी आहेत. कोल्हापूरकर अक्षरशः पाण्यासाठी तडफडत आहेत. पाण्यासाठी दारोदारी भटकंती करत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. अनेक झोपडपट्टीवासीयांना कूपनलिका असलेल्या कुटुंबीयांच्या दारात पाण्यासाठी याचना करावी लागत आहे. थेट पाईपलाईनमधून पाण्याची आणखी किती वर्षे वाट पाहायची, असा प्रश्न शहरवासीयांतून विचारला जात आहे. कागदी घोड्यांचा खेळ करणार्‍या महापालिका प्रशासनाने ठेकेदार कंपनीवर ठोस कारवाईची पावले उचलून लवकर योजना पूर्ण करून घेणे आ?वश्यक आहे.

महापुरासाठी पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. धोका पातळी 43 फूट आहे, हे ओळखूनच कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणारी उपसा केंद्रे (पंपिंग स्टेशन) तब्बल 48 ते 50 फुटांवर बांधण्यात आली. यात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर उपसा केंद्र, भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांचा समावेश आहे. परंतु सद्य:स्थितीत या उपसा केंद्रांना महापुराचा विळखा पडत आहे. परिणामी

पंचगंगा व भोगावती नदीतून शहराला पाणीपुरवठा करणारी केंद्रेच बंद पडली आहेत. 2019 मध्ये तब्बल 22 दिवस पाणीपुरवठा बंद होता. यंदा 23 जुलैपासून कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा झाल्यास भविष्यात महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी योजनेच्या कामाची पाहणी करून जानेवारी-फेब—ुवारीपर्यंत योजना पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योजनेचा आढावा घेऊन मेमध्ये योजना पूर्णत्वास जाईल, असे सांगितले. दोन्ही मंत्र्यांनी दोन-चार महिन्यांच्या फरकाने योजना पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल, अशी ग्वाही दिली आहे. परंतु महापालिका अधिकारी किंवा ठेकेदार कंपनी छातीठोकपणे योजना कधी पूर्ण करू, असे सांगू शकत नाहीत.

थेट पाईपलाईनच्या पाण्याची आणखी किती वर्षे वाट पाहायची?

महापालिकेकडून सात वर्षे कागदी घोड्यांचा खेळ

योजना द़ृष्टिक्षेपात…

योजनेची किंमत : 488 कोटी
वर्कऑर्डर : 28-8-2014
कामाची मुदत : 27 महिने

पहिली मुदतवाढ : 31-5-2018

दुसरी मुदतवाढ  : 31-12-2019

तिसरी मुदतवाढ : 31-12-2021

प्रमुख अपूर्ण कामे…

काळम्मावाडी धरणात दीडशे फूट खोल दोन जॅकवेल
काळम्मावाडी धरण क्षेत्रात होणारे इन्स्पेक्शन वेल – 1
धरण क्षेत्रात होणारे इन्स्पेक्शन वेल – 2
धरण परिसरात प्रेशर टँक बांधणे
सोळांकूरमधून पाईपलाईन 2.60 कि. मी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news