हेलिकॉप्टर येईना; ए, काढ रे गाड्या…! सातार्‍यातून सांगलीकडे अजितदादांची पूरग्रस्तांसाठी धाव

हेलिकॉप्टर येईना; ए, काढ रे गाड्या…! सातार्‍यातून सांगलीकडे अजितदादांची पूरग्रस्तांसाठी धाव

सातारा : हरीष पाटणे : सोमवारच्या सकाळी सातार्‍यात धो धो पाऊस सुरु झाला. हवामान ढगाळले. सांगली-कोल्हापूरकडे हेलिकॉप्टर मधून जाण्यासाठी सातारच्या शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री विसावलेले अजितदादा सोमवारी सकाळी सुरु झालेल्या पावसामुळे अस्वस्थ झाले. हेलिकॉप्टर जावू शकणार की नाही अशी शंका निर्माण झाली. शेवटी वातावरणाचा अंदाज घेवून अजितदादांनी 'ए काढ रे गाड्या' असे फर्मान सोडत सांगलीच्या पूरग्रस्तांकडे मोटारीने धाव घेतली!

रविवारच्या रात्रीच अजितदादांनी सातार्‍याचा आढावा घेतला होता. त्यावर उपाय योजनांनाही त्यांनी सुरुवात केली होती. रात्री उशिरा झोपलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी सहालाच सातार्‍यातून कामाला सुरुवात केली. दिवस उजाडल्या उजाडल्या त्यांनी सांगली, कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांशी फोनवरुन चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानाने पाटणच्या दौर्‍यावर येणार होते.

त्यांचे विमान येवू शकणार की नाही याची माहिती अजितदादा घेत होते. त्याचवेळी सांगली व कोल्हापूरसाठी अजितदादांचे हेलिकॉप्टर सातारच्या सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवरुन 8 वाजून 35 मिनिटांनी टेकऑफ करणार होते. आधीच अजितदादांनी कुणीही भेटायला यायचे नाही अशी तंबी देवून ठेवली होती. त्यामुळे मोजकेच अभ्यागत विश्रामगृहावर अजितदादांसमवेत होते. घड्याळाकडे पहात आलेल्या व्यक्तींकडून सातारा जिल्ह्यातील नुकसानीची व अन्यबाबींची माहिती अजितदादांनी घेतली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर, राजकुमार पाटील, बाळासाहेब सोळस्कर, सुभाषराव शिंदे, मंगेश धुमाळ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना संध्याकाळच्या बैठकीपर्यंत आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या. राज्यातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी फोनवरुन बोलून त्यांनी तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. याचदरम्यान सातारा, जावलीतील नुकसानीची माहिती देण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले अजितदादांना भेटायला आले. त्यांनी जावली व सातारा तालुक्यातील विदारक परिस्थिती मांडली. अजितदादांनी त्यावरही अधिकार्‍यांना सूचित केले.

अजितदादांचे हेलिकॉप्टरच्या वेळेकडे लक्ष

चर्चा सुरु असतानाच अजितदादांचे हेलिकॉप्टरच्या वेळेकडे लक्ष होते. ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर येईल की नाही याविषयी ते स्वत:ही साशंक होतेच. हेलिकॉप्टर जावू शकणार नाही हे लक्षात येताच आता दौरा रद्द करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सांगली व कोल्हापूरकडे जाणारे रस्तेही बंद.

मात्र, सातारा जिल्ह्याची खडान्खडा माहिती असलेल्या अजितदादांनी पर्यायी रस्ता सांगितला.

'हेलिकॉप्टर राहू दे, गाड्या काढा, मी सांगतो त्या रस्त्याने चला', असे म्हणत अजितदादा तडक उठले. त्यांनी गाडीत बसण्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना आपण गाडीने येत असल्याचे निरोप देण्यास सांगितलेे.

हेलिकॉप्टर आले नाही म्हणून दौरा रद्द न करता, रस्ते जलमय आहेत म्हणून माघारी न जाता अजितदादांनी पूरग्रस्तांकडे धाव घेतलीच.

सातारच्या शासकीय विश्रामगृहावर रविवारच्या रात्री व सोमवारच्या सकाळी अजितदादांची दिसलेली ही धडाडी निश्चितच स्पृहणीय होती.

हे ही पाहा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news