उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महामार्गावर उड्डाणपुलांसाठी केंद्राकडे प्रस्ताव देणार | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महामार्गावर उड्डाणपुलांसाठी केंद्राकडे प्रस्ताव देणार

सांगली : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महामार्गावर उड्डाणपुलांसाठी केंद्राकडे प्रस्ताव देणार आहे. महापुराच्या काळात पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी पाण्याखाली जातो. त्यामुळे कोल्हापूरसह अनेक ठिकाणची संपर्क यंत्रणा ठप्प होते. ते टाळण्यासाठी पाणी येणार्‍या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पूरग्रस्तांना मदत देण्याबाबत ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांत उच्चस्तरीय बैठक होईल. त्यावेळी मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तातडीच्या उपाययोजनांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल. केंद्र सरकारनेही पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत जबाबदारी पार पाडावी.

ना. पवार, पालकमंत्री जयंत पाटील, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस आणि सांगली येथीलपूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ना. पवार पत्रकारांशी बोलत होते.

ना. पवार म्हणाले, महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आपत्तीच्या काळात महामार्ग सुरू राहिले पाहिजेत. त्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबांमधील सुमारे 1 लाख 97 हजार लोक विस्थापित झाले आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. अतिवृष्टी व महापुराच्या नुकसानीच्या वेळी भरपाई देताना राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल.
ते म्हणाले, धरण क्षेत्राबरोबरच यावेळी फ्री कॅचमेंट एरियात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्याचा फटका 9 जिल्ह्यांमध्ये बसला आहे. केंद्रानेही चांगली मदत केली. एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही यांची या संकटात चांगली मदत झाली.

ते म्हणाले, वारंवार पूरबाधित होणार्‍या भागातील लोकांचे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. सन 2005 व 2019 या वेळच्या महापुरापेक्षा यावर्षीची स्थिती वेगळी आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पुन्हा अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. जुलैमध्ये धरणे बर्‍याच प्रमाणात रिकामी असल्याने पडणार्‍या पावसाचे पाणी धरणांमध्ये साठविणे शक्य झाले. पण आता धरणे बर्‍याच अंशी भरल्यामुळे ऑगस्टमध्ये जर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर ते पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पुढील काळात अधिक दक्षतेने व सतर्क राहून नुकसान कसे टाळता येईल हे पाहिले पाहिजे.

Back to top button