डोंबिवली : कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक | पुढारी

डोंबिवली : कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा 

धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो पुरवणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवली येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपीकडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेज मधील विद्यार्थ्यांना गांजा पुरवत होता.

तसेच, या प्रकरणातील राम नगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे. एक इसम अमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस हा इसम पदार्थांची विक्री करणार असल्याचेही समजले होते.

तसेच, सापळा रचल्यानंतर एक इसम मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतले असता २० किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. त्यानंतर तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यातील मुख्य आरोपी फरार आहे. अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (PI) शेखर बागडे यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे , मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास ते करत आहेत.

हे ही वाचलं का 

Back to top button