10 कोरोनामृत एसटी कर्मचारी वारसांनाच 50 लाख | पुढारी

10 कोरोनामृत एसटी कर्मचारी वारसांनाच 50 लाख

मुंबई ; सुरेखा चोपडे : एसटी महामंडळात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या 308 एसटी कर्मचारी यापैकी केवळ 10 जणांच्या वारसांना 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर अनुकंपातत्वावरील नोकरीकरिता 34 जणांना नोकरी देण्यास मंजुरी दिली असून प्रत्यक्षात 10 जणांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे.

टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून एसटी कर्मचार्‍यांनी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूक केली आहे. राज्यातील मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यत सुरक्षित सोडण्याची जबाबदारी देखील एसटीच्या कर्मचार्‍यांनीच पेलली.

याशिवाय मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी बेस्टच्या ताफ्यात एसटीच्या एक हजार बस काही महिने होत्या. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. एसटी महामंडळात नऊ हजार 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आठ हजार 700 कर्मचारी बरे झाले आहेत.

नोकरी ऐवजी 10 लाखांच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामुळे नोकरी ऐवजी या 10 लाखांच्या आर्थिक मदतीसाठी महामंडळाकडे काही वारसांनी अर्ज केले आहेत.

संपकर्‍यांवर आता थेट चार्जशिट

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर आजही कोणताही तोडगा निघाला नाही. महामंडळाने कर्मचार्‍यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली. निलंबित केलेल्या सुमारे 11 हजार 24 जणांवर बडतर्फीची कारवाई सुरू आहे. आता महामंडळाने आजही संपात सहभागी कर्मचार्‍यांना थेट चार्जशिट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक डेपोमधील संपकर्‍यांवर आरोपपत्र ठेवण्यात येत आहे.

5,555 कर्मचारी बडतर्फ

महामंडळाने सोमवारी 343 कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली. यामुळे बडतर्फ कर्मचार्‍यांची संख्या पाच हजार 555 झाली.एकूण बडतर्फीची बजावलेल्यांची संख्या सात हजार 235 झालीआहे.

Back to top button