मुंबईत कोरोना नियंत्रणात | पुढारी

मुंबईत कोरोना नियंत्रणात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरासह आसपासच्या परिसरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईकरांना चिंतेचे कारण नाही, असा दावा बुधवारी मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून आलेले निर्बंध याविषयी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

ओमायक्रॉन विषाणू धोक्याची घंटा ठरत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लसीकरण, बेड व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन, ऑक्सिजन पुरवठा आदी उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी पालिका प्रशासनाला दले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने जेष्ठ वकील अ‍ॅड. अनिल साखरे यांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर केले.

6 ते 9 जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये दररोज 20 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण सापडत होते. परंतु आता रुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत असून 18 जानेवारीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या 7 हजारांवर आली आहे. शहरातील रुग्णालय, कोविड सेंटर सर्व ठिकाणी पुरेशा खाटा, औषधांचा साठा, ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध असल्याचेही साखऱे यांनी स्पष्ट केले.

या सुनावणीत याचिकाकर्त्यांनीही पालिकेच्या कामाचे कौतुक केले आणि मुंबई महापालिकेप्रमाणे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आणि त्यासाठी उपलब्ध संसाधनांचा तपशील प्रतिज्ञापत्रावर मागविण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार खंडपीठाने राज्य सरकारलाही सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर कऱण्याचे निर्देश देत सुनावणी 27 जानेवारीपर्यंत तहकूब केली.

Back to top button