Navratri 2023: पेडगावच्या रेणुका माता मंदिरात अनोखी हलती दीपमाळ | पुढारी

Navratri 2023: पेडगावच्या रेणुका माता मंदिरात अनोखी हलती दीपमाळ

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पेडगाव (ता.परभणी) येथील 700 वर्षांचा इतिहास लाभलेल्या ग्रामदैवत रेणुकामाता मंदिर परिसरातील 26 फूट उंचीची व बुडाचा परिघही 26 फूट असलेली हलती दीपमाळ आहे. बारव व त्यातील पाण्यातील बुडबूडे ऋतुनुसार उबदार व थंड होणारा गाभारा अशा वैशिष्ट्यांनी हे मंदिर अनोखे ठरले आहे. नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम व त्यानिमित्ताने भाविकांची मोठ्या संख्येने येथे गर्दी होऊ लागली आहे. (Navratri 2023)

परभणी ते पाथरी रोडवर परभणी शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरील 10 हजार लोकसंख्येच्या पेडगावला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावाचे नावच मुळी येथील संपन्न अशा नैसर्गिक वारशाने मिळालेले आहे. त्याकाळी परिसरात घनदाट जंगल असल्याने याला पेडाचे गाव असे म्हटले जायचे. देशमुखी सनदेत याचा उल्लेख पेडाचे गाव असा आहे. त्याचाच नामविस्तार पेडगाव असा झाला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. (Navratri 2023)

गावात प्रवेश करतानाच दक्षिणेस प्रथमदर्शनी रेणुका मातेचे मंदिर आहे. आतील गाभार्‍यात रेणुका मातेचा भव्य असा तांदळा आहे. या गाभार्‍याचे वैशिष्ट म्हणजे तो उन्हाळ्यात थंड तर झोंबणार्‍या थंडीत उबदार वाटतो. देवीचे हे स्थान ग्रामदैवतेच्या रूपाने एक श्रद्धास्थान आहे. मंदिरासमोरच उंच असलेल्या मिनारला दीपमाळ असे म्हणतात. 26 फूट उंच व बुडाचा परिघही 26 फूटच आहे. अनेक ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. दीपमाळीचे खास वैशिष्टये म्हणजे आजही वरच्या टोकावरून ती हालवली तर ती बुडापर्यंत हालते. त्याचबरोबर बाजुच्या बारवेतील पाण्यात बुडबूडे निघतात. परंतु, आता बारवेचे नुतनीकरण झाल्याने बुडबुडे दिसत नाहीत. मात्र, दीपमाळ हलताना दिसते. त्याचे गूढ आजही कायम आहे. मंदिर स्थापत्य व वास्तुकलेचा एक अजोड असा नमुना आहे.

हेही वाचा 

Back to top button