तुम्ही तलाठी होऊन दाखवा; भुजबळ यांना जरांगे यांचे आव्हान | पुढारी

तुम्ही तलाठी होऊन दाखवा; भुजबळ यांना जरांगे यांचे आव्हान

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : छगन भुजबळ यांनी तलाठी होऊन दाखवावे, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले आहे. तसेच ते स्वतःला ओबीसींचे नेते म्हणवतात आणि नाभिक समाजाचा जाणूनबुजून अपमान करतात. ते खरोखरच ओबीसीचे नेते असतील, तर त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे. येत्या 10 तारखेपासून आपण उपोषणावर ठाम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळांना राष्ट्रपती पदासाठी शुभेच्छा देता का? यावर ते म्हणाले, ते ग्रामपंचायत सदस्य तरी होतील काय, हेही सांगणे कठीण आहे. त्यांना शुभेच्छा कसल्या द्यायच्या. त्यांना सांगा, आता तुम्ही तलाठी व्हा, असा खोचक टोलाही जरांगेंनी लगावला. भुजबळ यांनी माफी मागितली नाही तर नाभिक बांधवांचा मुद्दाम अपमान करण्यासाठी ते बोलले, असे उघड होईल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलेला नाही. अर्थात, त्यांनी राजीनामा दिला किंवा दिला नाही, यामुळे आम्हाला कसलाच फरक पडत नाही.

दरम्यान, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार, असा सवाल जरांगे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कार्यवाही सुरू असल्यामुळे जरांगे यांनी सतत आंदोलन करू नये, असा सल्ला त्यांना देसाई यांनी दिला आहे. यावर ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक गावात सापडलेल्या नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावल्या का? केवळ आठ टक्के ग्रामपंचायतींनी याद्या लावल्या आहेत. सरकारने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्यासाठीच 10 फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button