जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीत चर्चेसाठी यावे, त्यांना कुणीही अडवणार नाही : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीत चर्चेसाठी यावे, त्यांना कुणीही अडवणार नाही : मनोज जरांगे-पाटील

वडीगोद्री ; पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्‍या आंदोलनाला आता महाराष्‍ट्राच्या अनेक जिल्‍ह्यातून मराठा बांधवांचा पाठिंबा वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. असे असताना आज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस म्हणतात, मीडियाच्या माध्यमातून चर्चा होणार नाही. चर्चेचे दारे खुली पाहिजे असे म्हणाले होते. त्यावर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, हे खर आहे, म्हणून तर मी म्हणतो चर्चेसाठी या. तुम्हाला एकही मराठा अडवणार नाही. पण फक्त एकदाच काय ती चर्चा होईल अशी भूमिका जरांगे यांनी स्‍पष्‍ट केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का.? मी त्यांना कालच चर्चेचे आमंत्रण दिले. त्यांनी अंतरवाली सराटी गावात आमच्याशी चर्चा करण्यासाठी यावे. त्यांना कुणीही अडवणार नाही. एकदा तरी त्यांनी चर्चेसाठी यावे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मंत्री तानाजी सावंत दोन दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणतात, हेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का सांगत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचा सरकारशी कोणताही संवाद नसून, आणखी 2 ते 3 दिवस सरकारची वाट बघू अन्यथा त्यांना माणुसकी समजत नसेल, तर आम्ही त्यांना दाखवू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात जिथे जिथे साखळी उपोषण सुरू आहे. तिथे आमरण उपोषण आजपासुन सुरू झाले आहे. या आमरण उपोषणाची माहिती आंदोलकांनी आपापल्या पोलीस ठाण्याला अर्जाच्या माध्यमातून द्यावी असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना केले आहे. शांततेत आंदोलन करा, आत्महत्या करू नका. उग्र आंदोलन करू नका. आपली एकजूट ठेवा, ती फुटू देवू नका. आपल्यात फूट पडू देऊ नका असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button