पुढारी ऑनलाईन डेस्क: ओडिशातील एका बस चालकाच्या शहाणपणाची सर्वत्र चर्चा होत आहे. बस चालक प्रवाशांना घेऊन निश्चित स्थळी जात होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. छातीत दुखत असल्याचे सांगतच, त्याला स्वत:ला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच, त्याने बस भिंतीवर आदळली. त्याच्या या प्रसंगसावधानतेमुळे बसमधील ४८ प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र बस चालकाचा अखेर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (Heart attack)
शुक्रवारी रात्री ओडिशामधील पाबुरिया गावाजवळ (जि-कंधमाल) ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सना प्रधान नावाच्या चालकाच्या बस चालवताना अचानक छातीत दुखू लागले आणि त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्याला समजले की, तो पुढे गाडी चालवू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळले, त्यानंतर ते थांबले आणि प्रवाशांचे प्राण वाचले. (Heart attack)
या पोलिसांनी सांगितले की, ही बस काल रात्री भुवनेश्वरला जात होती, त्यात ४८ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी चालकाने प्रसंगसावधानता दाखवून, वाहन एका भिंतीवर आदळले, त्यामुळे त्याने अखेरचा श्वास घेण्यापूर्वीच बस थांबवली. (Heart attack)
'मां लक्ष्मी' ही खाजगी बस साधारणत: दररोज रात्री ओडिशातील कंधमालमधील सारंगढ येथून उदयगिरी मार्गे राज्याची राजधानी भुवनेश्वरला जाते. या घटनेनंतर बस चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रधान यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.