तुळजापुरात ‘पेड दर्शन’चे नियोजन कोलमडल्याने गोंधळाची स्थिती | पुढारी

तुळजापुरात ‘पेड दर्शन’चे नियोजन कोलमडल्याने गोंधळाची स्थिती

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या नवरात्रौत्सवाला घटस्थापनेदिवशीच प्रशासनच्या बेफिकीरीचे गालबोट लागले. पेड दर्शनाचे नियोजन कोलमडल्याने दूरहून आलेल्या व रांगांमध्ये तिष्ठत उभे असलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भाविकांचा संताप अनावर झाल्यावर अखेर दोन ते अडीच तास पेड दर्शन बंद ठेवण्याची नामुष्की व्यवस्थापन समितीवर ओढवली.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदीर प्रशासनाने दर्शनाच्या तीन रांगा केल्या आहेत. पहिली आहे ती व्हीआयपी दर्शन, दुसरी पेड दर्शन आणि तिसरी सर्वसामान्य भाविकांची. यात पेड दर्शनासाठी ३०० रुपये मोजावे लागतात. ही रक्‍कम गर्दीच्या आवाका पाहता अगदीच कमी आहे. त्यामुळे रविवारी (दि. 15) अनेक भाविकांनी पेड पासचा पर्याय निवडला. अनपेक्षित पेड दर्शनाची गर्दी वाढली. त्यातच व्हीआयपी दर्शनरांगेतही अशीच गर्दी झाली.

या सर्वांचे नियोजन करण्यात मंदिर प्रशासन कमी पडले. यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या रांगा थांबू लागल्याने भाविकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे बराच वेळ येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर दोन ते अडीच तास पेड दर्शन बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. याबाबत नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

हेही वाचंलत का?

Back to top button