बीड: गुंतेगाव येथे छाप्यात १ कोटींची अवैध वाळू जप्त | पुढारी

बीड: गुंतेगाव येथे छाप्यात १ कोटींची अवैध वाळू जप्त

गेवराई, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील गुंतेगाव परिसरातील गोदापात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक करून उत्खनन केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे व चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या सुचनेवरून पोलीस पथकाने छापा मारून ६ ट्रॅक्टर केनीसह १ ट्रॉली व ६०० ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई आज (दि.७ ) दुपारी तीनच्या सुमारास केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुंतेगाव  याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची कुजबूज पोलिसांना लागली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आज छापा टाकला. यावेळी ६ ट्रॅक्टर व केनीसह १ ट्रॉलीच्या साह्याने गोदापात्रात वाळू उपसा सुरू होता. तसेच याठिकाणी ५०० ते ६०० ब्रास वाळू साठा पडलेला होता. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. आत्तापर्यंत गुंतेगाव परिसरातील गोदापात्रात ही मोठी कारवाई मानली जाते.

या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार दिवसापूर्वीच राक्षसभूवन येथे मोठी कारवाई करण्यात आली होती. या आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

हेही वाचा 

Back to top button