छ. संभाजीनगर: केऱ्हाळा येथे माकडाचा धुमाकूळ; घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस | पुढारी

छ. संभाजीनगर: केऱ्हाळा येथे माकडाचा धुमाकूळ; घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस

केऱ्हाळा; पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे एका माकडाने घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस करत नागरिकांवर हल्ला करुन हैदोस घातला आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून माकडाने घरात घुसून घरातील टी.व्ही. आरसा, कपाटाची काच व काचेच्या दिसेल, त्या वस्तू फोडण्याचा सपाटा लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गल्लीतील ज्या घराचा दरवाजा उघडा दिसेल, त्या घरात ते माकड घुसून टी.व्ही, आरसा, काचेची भांडे फोडत आहे. अशावेळी नागरिकांनी, महिला किंवा मुलांनी त्या माकडाला घरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास माकड त्यांच्यावरही हल्ला करत आहे.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास येथील जि. प.शाळेत मतदान जनजागृतीसाठी कला पथक सादरीकरण सुरु होते. यावेळी विद्यार्थी खुल्या मैदानावर बसलेले होते. यावेळी त्या वानराने शाळेच्या अवारात प्रवेश करुन शाळेतील टी.व्ही. फोडली. कृष्णा कुमावत यांच्या घरातील टी. व्ही.व इलेक्ट्रिक बोर्ड, वायरींगचे नुकसान केले.

सुर्यभान बन्सोड यांच्या घरातील मोठा आरसा व टेबल फॅनचे नुकसान केले. प्रकाश शांताराम पांढरे यांच्या घरातील मोठा आरसा फोडला. तर जनार्धन बोराडे यांच्या घरातील टी. व्ही फोडण्याचा प्रयत्न केला. माकडाच्या हल्ल्यामुळे गावात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हैदोस घालणाऱ्या माकडाचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button