लातूर: १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान; सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी | पुढारी

लातूर: १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान; सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता मॉक पोल घेण्यात आले. लातूर शहरात सकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बऱ्याच जणांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले. सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे ७.९१ टक्के एवढे मतदान झाले. तर १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान झाल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी सकाळी लातूर येथील कृपासदन नजीक असलेल्या केंद्रावर मतदान केले. बाभळगाव येथे आमदार अमित देशमुख यांनी मतदान केले. लातूर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ४२ मतदार आहेत. २ हजार २१५ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. १६ हजार ७६५ कर्मचारी कार्यरत असून यात बीएलओ, चतुर्थश्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्‍य कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी आदींचा समावेश आहे.

प्रत्‍येक मतदार केंद्रावर पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. 789 मतदान केंद्रांवर पेंडॉल टाकण्‍यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रावर उपलब्‍ध असलेल्‍या खोलीत मतदारांना पंखा, पिण्‍याचे पाणी, बसण्‍यासाठी खुर्च्‍यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. मतदान पथक (2125), क्षेत्रीय अधिकारी (242), स्थिर निगराणी पथके (26), भरारी पथके (34), व्‍हिडिओ संनिरिक्षण पथके (24) व राखीव पथके (30) या पथकांसाठी एकूण जीप 793, बसेस 301 यावर जीपीएस लावण्‍यात आलेली आहेत.

जिल्‍हाधिकारी कार्यालयातून निगराणी करण्‍यात येत आहे. मतदान केंद्राच्‍या सुरक्षेसाठी 3567 पोलीस कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आलेले आहेत. कायदा व सुव्‍यवस्‍थेसाठी बीएसएफ, एसआरपी, सीआरएफपी, एसआरपीची पथके तैनात केली आहेत. 16 मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे सुरक्षेच्‍या दृष्‍टीने योग्‍य त्या उपायोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. शीघ्र कृती दल कार्यरत असून सीमा भागावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. 1062 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्‍यात येत आहे.

हेही वाचा 

Back to top button