Devendra Fadnavis : कुणावरही अन्याय नाही, सरसकट गुन्हे मागे घेणार नाही : फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis : कुणावरही अन्याय नाही, सरसकट गुन्हे मागे घेणार नाही : फडणवीस

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि.२७) खुलासा केला आहे. सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis

फडणवीस यांनी सांगितले की, गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आले आहेत, त्यात आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र, घरे जाळणे, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत. Devendra Fadnavis

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणावर सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. मी मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो. मात्र, या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. नोंदी असलेल्या रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्र कसे देता येईल, हा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटेल. दुसरीकडे हा निर्णय घेत असताना आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ दिलेला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, छगन भुजबळ यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली आहे. भुजबळ यांचेही लवकरात लवकर समाधान होईल.

ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा पुरावे नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचा हा विषय नव्हता. पण, ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे.

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरुच राहील. दरम्यानच्या काळात क्युरेटिव्ह याचिका सुद्धा लागली आहे. त्यातच यश मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. पण, त्यात यश मिळाले नाही, तर सर्वेक्षण कामी येणारच आहे. सुप्रीम कोर्टाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंतरवाली सराटी किंवा अन्य ठिकाणचे मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे आम्ही मागे घेतले आहेत. पण, ज्यांनी घरे जाळली, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले, त्यावर निर्णय घेतलेला नाही. कारण, अशा गुन्ह्यांबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button