जालना : वडीगोद्री येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक | पुढारी

जालना : वडीगोद्री येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराने शॉर्टसर्किट झाल्यामुळे एक एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना आज (दि. २४) दुपारी ४ च्या दरम्यान घडली. यात अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले.

वडीगोद्री शिवारातील गट नं ६४ मध्ये नारायण काशिनाथ डहाळे यांचा ४ एकर ऊस आहे. या उसामधून महावितरणची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनीच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. डहाळे यांचा ४ एकर पैकी एक एकर ऊस या आगीत जळून खाक झाला. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेवून आग विझवली. उर्वरित तीन एकरातील ऊस आगीपासून सुरक्षित राहिला. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले.

शेती विद्युत लाईनची दुरुस्ती होत नाही. अनेक ठिकाणी पोल वाकले आहेत. विद्युत तारा खाली आलेल्या आहेत. याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी नारायण डहाळे यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button