

मनुष्याच्या निधनानंतर त्याला शिवू नये, अशा एक ना अनेक प्रथा व अंधश्रद्धा समाजात असताना कळमनुरी येथील समशेर अली खान मात्र मागील 32 वर्षापासून पाण्यात बुडालेले मृतदेह बाहेर काढतात. त्यांची ही सेवा अविरत सुरूच असून यासाठी ते कुठलेही मानधन घेत नाहीत. केवळ सामाजिक दायित्व म्हणून हे काम सातत्याने व मनोभावे करीत (Hingoli News) आहेत.
(Hingoli News) कळमनुरी शहरातील पठाणगल्ली भागात राहणारे 52 वर्षीय समशेर अली खान हे शेती व्यवसाय करतात. ते नेहमीच सामाजिक कामात धावून जातात. त्यांचे वडीलही अडल्यानडल्यांची मदत करीत होते. त्यांचाच वारसा समशेर अली चालवित आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी समशेर अली यांनी पहिल्यांदा विहिरीत बुडालेला मृतदेह बाहेर काढला. तेव्हा अनेकांना त्यांचे कौतुक वाटले. तेव्हापासून त्यांनी प्रेत काढण्यासाठी सुरूवात केली. सुरूवातीला त्यांच्या पायाले प्रेताने पकडल्याचा भास झाला. त्यामुळे भीती वाटली. त्यानंतर ते पाच वर्ष आजारी पडले. परंतु, बुडालेले मृतदेह काढण्याचा वारसा पुढे सुरू ठेवायचा अशी खुणगाठ समशेर अली खान यांनी बांधली. जिल्ह्यात कोठेही पाण्यात बुडालेले मृतदेह काढण्यासाठी समशेर यांना बोलावता. वर्षातून दोन वेळा ते रक्तदानही करतात. तीन वर्षापूर्वी कोरोना काळात त्यांनी विविध धर्मातील 35 मृतदेहांचा अंत्यविधीही केला. तसेच 25 ते 30 जण पाण्यात बुडत असताना त्यांनी पाण्याबाहेर काढून त्यांना जीवदान दिले.
रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी ते पाण्यात उतरून बुडालेले मृतदेह न भीता काढतात. या कामात त्यांना आपल्या वडिलांचा वारसा मिळाला आहे, असे ते सांगतात. नदी, नाल्यांना पूर आल्यानंतर अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पाण्याबाहेर काढण्याची जोखीम समशेर अली उचलतात. अपघाताने पाण्यात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ती कसरत ते लिलया पेलतात. पूर परिस्थितीत प्रशासनाला पट्टीचे पोहणारे आवश्यक असतात. काम झाल्यानंतर मात्र प्रशासन अशा जिगरबाज सामाजिक कार्यकर्त्यांना विसरतात. शासनाकडून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अद्ययावत साहित्य उपलब्ध झाल्यास समशेर अली खान यांना काम करणे सोयीचे जाणार आहे. परंतु प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
कोरोना काळात पायी जाणार्या वाटसरूंची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, औषधांची व्यवस्था करण्यासाठी समशेर अली खान यांनी पुढाकार घेतला. अपघातात जखमी व रस्त्यावरील वाहनांच्या अपघातातील मृतदेह ते उचलून रूग्णालयात आणतात. नदी, तलाव, शेततळे, विहिरीतील मृतदेह ते पाण्याबाहेर काढतात. त्यांनी आपल्या फारूख पठाण व सोहेल पठाण या दोन्ही मुलांना या कामामध्ये आणले आहे. माणुसकी हा धर्म आहे. त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत आपण हे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकार्यांच्या हस्ते त्यांचा रक्षक हा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला आहे. नेहमीच मदतीसाठी धावून जाणार्या समशेर अली खान खर्या अर्थाने अवलिया ठरले आहेत.
दीड वर्षापूर्वी 46 वर्षीय सख्खा भाऊ इसापूर धरणात बुडाला. जीवाची बाजी लावून भावाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह काढताना कंठ दाटून आला होता. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी जुन्या साहित्यांचा वापर करतो. शासनाने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी आधुनिक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
– समशेर अली खान
हेही वाचा