हिंगोलीत रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान सापडले निजामकालीन तोफगोळे | पुढारी

हिंगोलीत रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान सापडले निजामकालीन तोफगोळे

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीत रुग्णालयाचे बांधकाम सुरु असताना ऐतिहासिक वस्तू सापडल्याची माहिती समोर आली आहे. बांधकामासाठी काढण्यात आलेल्या खोदकामात जवळपास दोनशेपेक्षा अधिक निजामकालीन तोफ गोळे सापडले आहेत. यामध्ये तीन प्रकारचे तोफ गोळे आढळून आले आहेत. या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. यामध्ये पाच किलो ते पंधरा किलो वजनांच्या तोफ गोळ्यांचा समावेश आहे.

शहरातील मध्य ठिकाणी असलेल्या तोफखाना परिसरातच जुने शासकीय रूग्णालय पाडुन त्या ठिकाणी महिला रूग्णालयाच्या इमारतीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. इमारतीच्या पायांसाठी खोदकाम करत असताना २०० पेक्षा अधिक लहान, मोठ्या आकाराचे तोफ गोळे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी 1986-87 च्या दरम्यान जुन्या इमारतीचे बांधकाम करीत असताना एका तोफेसह शेकडो तोफ गोळे आढळून आले होते. अजूनही ती तोफ येथील शहर पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आली आहे.

निजामाची राजवटीतील दारूगोळा ठेवण्यासाठीचा तोफखाना

१९४८ पुर्वी मराठवाड्यावर निजामाची राजवट होती. तर इतर भाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. तत्कालीन कळमनुरी जिल्ह्यामध्ये हिंगोली परगण्याचा समावेश होता. हिंगोली येथे निजामाचा तबेला, तोफखाना, सेवानिवृत्त सैनिकांसाठी स्वतंत्र वसाहत, सैन्यांसाठी रसद पुरवठा करण्यासाठी मोठ्या इमारतीचा समावेश होता. ज्या ठिकाणी रसद ठेवण्यात येत असे त्या ठिकाणाला रिसाला संबोधण्यात येते. अजूनही शहरात रिसाला परिसर आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर सैनिकांसाठी येथे पेन्शनपुरा नावाची स्वतंत्र वसाहत उभारण्यात आली होती. तसेच निजामांच्या सैनिकांंच्या घोड्यासाठी तबेलाही अस्तित्वात होता. तसेच दारूगोळा ठेवण्यासाठी तोफखाना तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या तोफखान्याची निर्मिती इंग्रजांनी करून ती निजामाला दिली होती.

निजामापासून मराठवाड्याला मुक्‍त करण्यासाठी शहरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिर्घ लढा दिला होता. यामध्ये प्रामुख्याने माणिकराव टाकळगव्हाणकर, कै. अण्णाराव टाकळगव्हाणकर, कै. त्रिलोकसिंग शेेठी यांचा समावेश होता. त्रिलोकसिंग शेठी यांचे नातु असलेले हरपालसिंग शेठी यांना शहरातील निजामकालीन कारकिर्दीसह इमारती व वस्तुंचा त्यांच्या आजोबांकडून इतिहास माहिती झाला. काही दिवसांपुर्वीच सापडलेल्या तोफ गोळ्यांबाबतही हरपालसिंग शेठी यांनी माहिती दिली.

Back to top button