समृद्धी महामार्ग की ‘मृत्यू मार्ग’? .. पाच महिन्यांत ४०० अपघातांत ४५ बळी | पुढारी

समृद्धी महामार्ग की 'मृत्यू मार्ग'? .. पाच महिन्यांत ४०० अपघातांत ४५ बळी

छत्रपती संभाजीनगर; गणेश खेडकर :  जानेवारी ते २४ मे या पावणेपाच महिन्यांत समृद्धी महामार्गावर तब्बल ४०० अपघातांत ४५ जणांना जीव गमवावा लागला. धक्कादायक म्हणजे, यांतील सर्वाधिक ११० अपघात हे चालकाला डुलकी लागल्यामुळे आणि शेकडो कि.मी. सलग प्रवास केल्याने घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग म्हणावा की मृत्यू मार्ग ? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

२४ मे रोजी पहाटे पावणेसहा वाजता करमाडजवळ चालकाला डुलकी लागल्याने भरधाव इर्टिगा कार दुभाजकाला धडकून चौघे भाऊ ठार झाले. यापूर्वीही कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त करणारे भयंकर अपघात समृद्धीवर घडले आहेत. दरम्यान, समृद्धीचे लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते २४ मे या पावणेपाच महिन्यांत ४०० अपघात घडले. यात ४५ जणांनी जीव गमावला. १५० हून अधिक लोक अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले असून २५० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. १७० अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

‘समृद्धी’वर येताच पाऊण तासात अपघात

बुधवारी झालेल्या अपघातातील गौड कुटुंबीय २३ मे रोजी सकाळी दहा वाजता तेलंगणा येथून निघाले होते. ते जालना येथून समृद्धी महामार्गावर गेले. तेथून करमाडपर्यंत आल्यावर अवघ्या पाऊण तासात त्यांच्या कारला अपघात झाला. यात चौघांचा जीव गेला.

अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांची मोहीम

समृद्धीवरील अपघात टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जामादार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली जात आहे. उपनिरीक्षक अरुणा घुले या जनजागृती करणारे व्हिडीओ बनविणार आहेत. शिवाय, त्यांनी अपघाताची कारणे आणि हे अपघात टाळण्यासाठी काय करावे, याचे मुद्दे मांडले आहेत.

ही आहेत अपघाताची कारणे

अपघात झाला, की महामार्ग पोलिसांनी त्याची नोंद घेत घटनास्थळ गाठून मदतकार्य केले आहे. त्यांनी अपघातांची कारणेही शोधली आहेत. सर्वाधिक ११० अपघात चालकाला डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. ९० अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यांमुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे ८०, प्राणी मध्ये आल्याने २०, तांत्रिक बिघाडामुळे २४, ब्रेक डाऊन झाल्याने १८; तर इतर काही कारणांमुळे ५८ अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हे आहेत अपघात टाळण्याचे मुद्दे

*कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. *पेट्रोल पंप सोडून अन्य वाहन थांबे करावेत. *मदत दूरध्वनी क्रमांकाचे फलक वाढवावेत. *रात्री आणि पहाटे अपघात होत असल्याने रोडवर डिजिटल बोर्ड लावावेत. * चालकाला डुलकी लागू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी ध्वज, फलक लावावेत.

Back to top button