राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे? : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे? : चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. उध्दव ठाकरेंवर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा विश्‍वास नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी राजीनामा दिला. आमचे सरकार कायदेशीर मार्गाने सत्तेवर आले आहे. त्यामुळे सरकारने राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे, अशी टिकाही केली.

आ. बावनकुळे गुरुवारी (दि. 11) जिल्हा दौर्‍यावर आहेत. शहरात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की हे खोके सरकार आहे, असे सांगत विरोधक सातत्याने टिका करीत होते. उध्दव ठाकरेंनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आजच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने सरकार कायदेशीर असल्याचे सिध्द झाले आहे. ठाकरेंवर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा विश्‍वास नव्हता. हे आमदार आपल्या विरोधात मतदान करणार हे लक्षात आल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नवीन सरकार बहुमताने सत्तेवर आले. एकनाथ शिंदे हे कायदेशीर पध्दतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

राज्यपालांवर ताशेरे … भाष्य टाळले

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयांवर ताशेरे ओढल्याचे सांगितल्यावर आ. बावनकुळे म्हणाले, की दोन संविधानिक अधिकार क्षेत्राचा तो विषय आहे. त्यावर बोलणे उचित नाही. मात्र शिंदे सरकार कायदेशीर ठरले आहे, हा विषय महत्वाचा आहे.

-हेही वाचा 

पुण्यातील या गावात तरुणांचं जमेना लग्न; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क?

Maharashtra politics: शिंदे सरकारला ‘दिलासा’ आहे, पण केवळ १५ दिवसांचा – अनिल परब

Back to top button