पुण्यातील या गावात तरुणांचं जमेना लग्न; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क? | पुढारी

पुण्यातील या गावात तरुणांचं जमेना लग्न; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क?

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : देश राजकारण्यांच्या दृष्टीने महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जुन्नर तालुका श्री छत्रपती शिवरायांच्या जन्म भूमीचे पुण्य क्षेत्र म्हणून ओळखले जाते, पण स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या मावळ्यांचे वंशज आदिवासी बांधव आजही पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. हा टाहो राजकारण्यांना अद्यापही ऐकू येत नाही.

कोणत्याही राजकारणी मंडळींना याची खंतच नाही. या आदिवासींकडे मते मागायला त्यांना काही वाटतही नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत फक्त आश्वासनाचे मोफत वाटप केले जात असून, आदिवासी जनतेच्या काहीही पदरात पडलेले नाही. रोजच मरणयातना भोगणारे आदिवासी मूलभूत गरजांपासून कोसो दूर ठेवण्यात आले आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावर कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी,पुताचीवाडी, जोशीचीवाडी, मारखुलवाडी, चारमोरी, वरेवस्ती, शिंदी फाटा, तळपेवस्ती, उंबराची वाडी, बुळेवस्ती, कवटेमळा, डामसेवस्ती, माळीवाडी, विरणकवस्ती, काठेवस्ती, हगवणे वस्ती, कुदळवाडी, बांगरवाडी, पिचडवस्ती, गुडघेवाडी, शैलाचा माळ, दळगेवस्ती, कवटेमळा, चिंचावळण, यावाडी-वस्त्यांमध्ये सुमारे 7 हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. कोपरे व मांडवे या दोन ग्रुप ग्रामपंचायत आहेत, परंतु हा भाग आजही पाण्यावाचून तळमळतो आहे. उन्हाळ्यात 4 महिने पाणी पाणी करून मनुष्य व प्राणी यांचा जीव कासावीस होत आहे. या गावांमध्ये एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये प्यायला तर सोडा पाण्याचे दर्शनही दुर्लभ असते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सन 2019 मध्ये निवडून आल्यावर जुन्नर तालुक्यातील कोपरे व जांभूळशी ही गावे दत्तक घेतली असून, येथील ग्रामस्थांनी त्यांच्या अनेक समस्यांबाबत खासदार, आमदार या लोकप्रतिनिधीना भेटून, लेखी निवेदने दिली; परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाण्यासारख्या जीवनावश्यक गरजेच्या गैरसोईमुळे अखेरची घटका मोजण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

हंडाभर पाण्यासाठी एक तास

मुथाळणे येथील गावठाण वाडीत पाण्याचा एक झरा वर्षानुवर्षे वाहत आहे. परंतु, येथे एक हंडा भरण्यासाठी एक तास लागत आहे. त्यात आजूबाजूला कुठे पाण्याची सोय नसल्यामुळे येथे मोकळ्या हंड्यांची रांग लागत आहे. पाणी भरायला नंबर येण्यासाठी चोवीस तासांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रात्रीचा दिवस करून पाणी भरण्यासाठी येथे ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते. येथे माणसांनाच प्यायला पाणी नाही, तर जनावरांसाठी पाणी आणायचे कुठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे यशोदाबाई पोफळे, चंदूभाई ठोंगीरे, बाबाबाई तळपे, फसाबाई गवारी यांनी सांगितले.

पाण्याविना लग्न जमेना

येथील तरुणांनी चांगले शिक्षण घेतले. नोकरी, व्यावसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. परंतु, या भागात पाणीप्रश्न अतिगंभीर असल्याने तरुणांना लग्न करण्यासाठी कोणी मुली द्यायलाही तयार नाहीत, असे सोमा मुठे यांनी सांगितले. एकूणच या भागातील पाणीप्रश्न म्हणजे पाण्याविना भिजत घोंगडे बनला.

Back to top button