हिंगोली : कर्तव्यावर असताना मद्यसेवन; पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : कर्तव्यावर असताना मद्यसेवन; पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथे तपासणीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आज (सोमवार) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. गिरी हे मध्यरात्री औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्यात तपासणीला गेले होते. यावेळी त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते, तर बोलता देखील येत नव्हते. त्यांच्या तोंडाला आंबट वास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांनी याबाबतची माहिती थेट पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांना कळविली होती. यामुळे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी त्यांची वैद्यकिय चाचणी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
औंढा पोलिसांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकिय चाचणीमध्ये ते दारूच्या अंमलाखाली असल्याचा लेखी अहवाल दिला. या अहवालानंतर जमादार दिलीप नाईक यांनी रितसर तक्रार दाखल केली. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडले आहे.

पोलिस निरीक्षक झुंजारे पुढील तपास करीत आहेत. हिंगोली जिल्हयात 13 पोलिस ठाण्यांमधून दररोज क्रॉस तपासणी केली जाते. यामध्ये पोलिस ठाण्याच्या लॉकअप मधील आरोपी तसेच इतर बाबी तपासल्या जातात. या शिवाय पोलिस रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या जातात. त्यासाठी एका पोलिस ठाण्याचे पथक दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठविले जाते. त्यानंतर संबंधित अधिकारी ठाण्यात तपासणी करतात. त्यानंतर त्याचा अहवाल पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे पाठविला जातो.

हेही वाचा :   

Back to top button