बुलढाणा : पोलीस मुख्यालयातून ३० एलपीजी सिलिंडर चोरणारा जेरबंद; तीन आरोपी फरार | पुढारी

बुलढाणा : पोलीस मुख्यालयातून ३० एलपीजी सिलिंडर चोरणारा जेरबंद; तीन आरोपी फरार

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातील गोदामातून ३० सिलिंडर लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील एकाला काही तासातच पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील अन्य तीन संशयित आरोपी फरार झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस कल्याण शाखेमार्फत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भारत गॅस कंपनीची दीपक एलपीजी गॅस सिलिंडर एजन्सी चालवली जाते. एजन्सीचे गोदाम पोलीस मुख्यालयाच्या आवारातच आहे. तीन एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोदामाची दोन कुलुपे तोडून तेथील ५१९ सिलिंडर्सपैकी एलपीजी गैसनी भरलेले ३० सिलिंडर (एकूण किंमत ९९,६९०रू) चोरले. ४ एप्रिलच्या सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.

वर्दळीचे ठिकाण असलेल्या पोलीस मुख्यालयातच चोरीची घटना घडल्याने पोलीस प्रशासनावर नामुष्की ओढवली होती. अज्ञात चोरट्यांनी या चोरीसाठी वाहनाचा वापर केला असावा या तर्काच्या आधारावर पोलिसांनी मार्गावरील सीसीटीवी फुटेज तपासले. यामध्ये ‘त्या’ रात्री या परिसरातून अॅपे वाहन गेल्याचे दिसून आले.

त्याचा छडा लावत पोलिसांचे तपास पथक संशयित आरोपीपर्यंत पोहचले. आरोपी शहरातील एका गॅस कंपनीच्या डिलरकडे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करीत असल्याचे व त्याने सिलिंडरच्या चोरीसाठी डिलीव्हरी अॅपे गाडी वापरल्याचे उघडकीस झाले. आरोपी दामोधर गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीचे ३० सिलिंडर हस्तगत केले व वाहनही जप्त केले आहे. या गुन्ह्यातील आणखी तीन साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा;

Back to top button