Shubman Gill : शुबमन गिलने विराट-रोहितला टाकले मागे, गाठली सर्वोत्तम वनडे क्रमवारी | पुढारी

Shubman Gill : शुबमन गिलने विराट-रोहितला टाकले मागे, गाठली सर्वोत्तम वनडे क्रमवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings Shubman Gill : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू शुभमन गिलने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो 738 रेटींगसह चौथ्या स्थानावर पोहोचला असून त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला खूप मागे टाकले आहे. कोहली सहाव्या तर रोहित आठव्या क्रमांकावर आहे. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. तर द. आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन दुसऱ्या स्थानावर आहे.

गिल (Shubman Gill) गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. एकप्रकारे उत्कृष्ट फॉर्मचे गिलला बक्षीस मिळाले आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पोहोचला आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माला त्याने मागे टाकले आहे.

शुबमनने (Shubman Gill) या वर्षी आतापर्यंत 9 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 78.00 च्या प्रभावी सरासरीने 624 धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याने 3 शतके, 1 अर्धशतक आणि 1 द्विशतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 208 आहे. शुबमनने वनडेत आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत आणि 65.55 च्या सरासरीने 1,311 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतके फटकावली आहेत.

गोलंदाजीत अव्वल 10 मध्ये फक्त एक भारतीय

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये आहे. तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी सिराजने आतापर्यंत 8 सामने खेळले असून 19 विकेट घेतल्या आहेत. 32 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. यावर्षी सिराजने 4.61 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली असून त्याने दोनदा 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये अव्वल स्थानावर

सूर्यकुमार यादव अजूनही टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटींग 906 आहे. दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. सूर्याने यावर्षी 6 टी-20 सामने खेळले असून 66.75 च्या सरासरीने 268 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 152.57 राहिला आहे. या वर्षी त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतकही केले आहे. सूर्याने गेल्या वर्षी 187.43 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती.

Back to top button