हिंगोली : दिव्यांगावर मात करीत ‘त्‍या’ दोघांनी उभारला व्यवसाय; सुशिक्षित बेरोजगारांसमाेर आदर्श (Video) | पुढारी

हिंगोली : दिव्यांगावर मात करीत 'त्‍या' दोघांनी उभारला व्यवसाय; सुशिक्षित बेरोजगारांसमाेर आदर्श (Video)

हिंगोली; पुढारी वृत्‍तसेवा : दिव्यांग असल्याचे रडगाणे न गाता सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोघा दिव्यांग मित्रांनी आपल्या दिव्यांगावर मात करीत दुचाकी, चारचाकी वाहने दुरूस्तीचा व्यवसाय सुरू केला. या कामातून आपला प्रपंच नेटकेपणाने सुरू करीत त्‍यांनी ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना आदर्शवत दिशा दिली आहे. दोघांनीही आपले दिव्यांगत्व विसरून खर्‍या अर्थाने रॅन्चो असल्याचे सिद्ध केले आहे.

गोरेगाव येथील भागवत पवार व संजय कावरखे हे शालेय जीवनापासून जीवलग मित्र आहेत. भागवत पवार यांची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी मुंबई येथे मिस्त्री काम केले. त्यानंतर नाशिक येथे सायकल दुरूस्तीचे काम केल्यानंतर त्यांनी पुणे येथे इंजिन बनविणार्‍या कंपनीत काम केले. दरम्‍यान, मशिनमध्ये डावा हात गेल्याने त्‍यांची चार बोटे निकामी झाली. यामुळे पुन्हा त्यांना गोरेगाव येथे परत यावे लागले.

हाताला अपंगत्व आल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला होता. परंतु परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवत भागवतने गावात दुचाकी दुरूस्ती व टायर विक्रीचे दुकान टाकले. परंतु नियतीने पुन्हा डाव साधत एका वर्षातच दुकानाला आग लागून दुकान आगीत भस्मसात झाले. भागवत पवारने खचून न जाता पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला. त्याच्या मदतीला संजय कावरखे हे दोन्ही पायाने जन्माच्या तीन वर्षापासूनच पोलिओमुळे अपंग असलेला मित्र आला. दोघांनी पावर स्प्रे, दुचाकी, गॅस शेगडी, तीन चाकी, चार चाकी वाहनांची इंजन दुरूस्तीचे काम हाती घेतले.

धडधाकट व्यक्‍तीला लाजवेल असे काम दोघांकडून केले जात आहे. परिस्थितीशी सामोरे जात दोघा दिव्यांगांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत यशस्वीरित्या आपला व्यवसाय उभारला आहे. विशेष म्हणजे भागवत पवार यांचा मुलगा आयटीआय करून एका कंपनीत काम करीत आहे, तर संजय कावरखे यांची मुलगी सध्या सातवीच्या वर्गात शिकत आहे.

आम्ही मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर आमचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. व्यवसाय वाढीसाठी बँकेने कर्ज उपलब्ध करून दिल्यास अद्यावत साधन, सामुग्री खरेदी करू शकतो. परंतू बँका मात्र आम्हाला कर्जासाठी प्रतिसाद देत नसल्याचे भागवत पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button