

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१) सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणांनंतर काही वस्तुंचे भाव वधारणार आहेत. तर काही वस्तूंचे भाव कमी होतील. काही वस्तूंवरील आयात कर वाढण्यात येणार असल्याने या वस्तू महाग होतील. त्यात सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा समावेश आहे. सिगारेटवरील नैसर्गिक आपत्ती कर (एनसीसीडी) १६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक सिगारेटही महाग होईल. आयात शुल्क वाढण्यात आल्याने इलेक्ट्रिक किचन चिमणीवरील भाव वधारणार असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्र्यांनी विदेशातून येणारी खेळणी, सायकल तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरात येणारी बॅटरीवरील आयात शुल्कात कपात केली आहे. मोबाईल फोनच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने येत्या काळात मोबाईल फोन स्वस्त (Budget 2023) होतील. मोबाईल कॅमेरा लेन्स, लिथियम सेल, मरीन प्रोडक्ट्सवर आयात शुल्क कपात करण्याचा निर्णय देखील अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरात येणारी बॅटरीवर आयात शुल्क हटवण्यात आल्याने या वाहनांच्या किमतीत घट होईल. यामुळे ही वाहने आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. एलईडी टीव्ही देखील स्वस्त होतील.
वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) अर्थसंकल्पानंतर काही निवडकच वस्तू स्वस्त अथवा महागतील. २०१७ नंतर जवळपास ९० टक्के उत्पादनांचे दर जीएसटवर आधारित आहे. जीएसटी कॉउंसिलकडून हे दर निश्चित केले जातात. विद्यमान स्थितीत जीएसटीचे ५, १२ , १८ आणि २८ टक्के असे चार स्लॅब आहेत. जीवनावश्यक वस्तुंना या करातून सवलत देण्यात आली आहे अथवा त्यांना सर्वात खालच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :