बीड : पांढर्‍या सोन्याची अवहेलना; भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या घराघरात कापसाचे ढीग | पुढारी

बीड : पांढर्‍या सोन्याची अवहेलना; भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या घराघरात कापसाचे ढीग

धारूर: अतुल शिनगारे : मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी क्षेत्र घटल्यामुळे चांगला भाव मिळेल, असे शेतकर्‍यांना वाटत होते. मात्र, जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी कापूस न विकता घरात त्याची साठवणूक केली आहे. मकर संक्रातीनंतर भाव वाढेल, असे वाटत होते. मात्र, नंतरही भाव वाढ न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

मागील वर्षी शेतकर्‍यांच्या पांढर्‍या सोन्याला विक्रमी भाव मिळाला होता. इतिहासात पहिल्यांदा दहा हजारापेक्षा अधिक भाव मिळाल्याने शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने कपासी ‘पांढरे सोने’ ठरले. दरम्यान सन 2022- 23 च्या हंगामात बीड जिल्ह्यामध्ये कपासीचे क्षेत्र घटून सोयाबीनचा पेरा वाढला. क्षेत्र घटल्यामुळे मागील वर्षापेक्षा अधिक भाव मिळेल, असे शेतकर्‍यांना वाटत होते. सुरूवातीला भाव साडे नऊ हजार रूपयांपर्यंत गेला; परंतु यानंतर हळूहळू भावात घसरण झाली.

घरात साठवलेला कापूस काय भावाने पडणार ?

सध्या 8 हजार 300 रूपयांच्या दरम्यान कापसाला भाव मिळत आहे. सुरूवातीला साडे नऊ हजार भाव होता. त्‍यामुळे यंदा भाव दहा हजाराच्या पुढे जाईल, असे शेतकर्‍यांना वाटत होते. यामुळे त्‍यांनी कपाशीची विक्री न करता तो घरात साठवून ठेवला आहे. मकर संक्राती नंतर भाव वाढेल, असा अंदाज काही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला होता; परंतु भाववाढ होण्याऐवजी तो दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. कापूस घरात साठवून ठेवला. परंतु तो कधीपर्यंत साठवायचा? पेरणी, बियाणे, फवारणी यासाठी काढलेल्या कर्जाचे मीटर सुरूच आहे. भाववाढ झालीच नाही. तर घरात साठवलेला कापूस काय भावाने पडणार ? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर प्रतिखंडी 31 ते 36 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरकीचे दर 3 हजार सहाशे ते 4 हजार प्रति क्विंटल असल्याने कापसाला आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात सरकीचा दर प्रतिक्विंटल तीन हजार चारशे रुपये पर्यंत खाली आल्याने कापसाचे दर कमी झाले होते. शेतकर्‍यांना दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची अपेक्षा आहे.

मागील वर्षी कपाशीला चांगला भाव मिळाला होता. यामुळे पुन्हा शेतकर्‍यांनी लागवड केली. पण, अतिवृष्टीमुळे कपाशी पिकावर विविध किड रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी अन् दरही योग्य नाही यामुळे शेतकर्‍यांनी कपाशी न विकता घरात साठवणुक केली आहे. आज- उद्या चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे.

अभिमान मुंडे, शेतकरी

भाव नसल्यामुळे सोयाबीन व कापूस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु ते किती दिवस घरातच साठवून ठेवावा, हा प्रश्‍न आहे. अर्थिक अडचणी आणि कौटुंबिक गरजांची पुर्तता करण्यासाठी जास्त दिवस कापूस- सोयाबीन घरात ठेवता येणार नाही. केंद्र सरकारने शेती उत्पादनाला किमान उत्पादनाच्या खर्चाला गृहीत धरून भाव देणे गरजेचे आहे.

विजय शिनगारे, शेतकरी धारूर

भारतामधील कापड मिलची मागणी सध्या थंडावली आहे. यामुळे भाव स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कॉटनची मागणी नाही, यामुळे भाव स्थिर आहेत. मार्च अखेर भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था थंड असल्याने भाववाढीवर नक्की भाष्य करता येत नाही.

माधव निर्मळ, जिनिंग उद्योजक, धारूर

हेही वाचा : 

Back to top button