बीड : बायको हरवल्याची तक्रार पडली महागात | पुढारी

बीड : बायको हरवल्याची तक्रार पडली महागात

केज, पुढारी वृत्तसेवा :  बायको हरवल्याची तक्रार करणे चांगलेच महागात पडले आहे. पाथरा येथील एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्या प्रकरणी तिचे आई- वडील, सासू-सासरे, नवरा आणि मामा मामीसह दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ जानेवारी रोजी धारूर पोलिस ठाण्यात लक्ष्मी नगर, धारूर येथून विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार कृष्णा मोटे यांनी केली होती. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांनी तपास करून सदरील महिला आणि आणि तिच्या सोबतचा युवक रोहित लांबूटे (रा. परळी) यांना दि. २७ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री, (ता. राहता ) येथून ताब्यात घेतले. त्या दोघांना धारूर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अशोक गवळी आणि महिला पोलिस हवालदार दीक्षा चक्के यांनी तपास केला.

तपास दरम्यान संबंधित विवाहिता अल्पवयीन असल्याचे सांगत केज तालुक्यातील पाथरा येथील शाळेतून तिच्या जन्मतारखेबाबत शालेय अभिलेख तप लक्षात येताच शाळेतून जन्मतारीख पाहण्यात आली. यात २४ एप्रिल २००८ ही जन्मतारीख असल्याचे स्पष्ट झाले. याची खात्री झाल्यानंतर धारूर येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना अवघ्या तेराव्या वर्षी २० नोव्हेंबर २०२१ रोजी तिचे मामा सागर अशोक धोंगडे (जानेगाव ता. केज) यांनी तिचे लग्न धारूर येथील कृष्णा वैजनाथ शेटे यांच्यासोबत लावून दिले. या बाबी सर्व उजेडात येताच धारूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास बालविवाहाचा प्रकार आणून दिला.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांच्या आदेशाने धारूर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस जमादार दीक्षा चक्के यांनी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात सबंधीत अल्पवयीन विवाहितेचा मामा सागर, अशोक घोगडे, मामी (रा. जानेगाव) वडील महारूद्र बबन पांगे, आई सिंधु महारूद्र पांगे, भाऊ ओमकार महारूद्र पांगे, (रा. पाथरा), पती कृष्णा वैजनाथ शेटे, सासू शिवकन्या वैजनाथ शेटे, दीर गणेश वैजनाथ शेटे, जाऊ वैशाली गणेश शेटे (रा. धारूर), नवनाथ पटणे (रा. शेलगाव- गांजी) या दहा जणांविरुध्द यूसुफवडगाव पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान आई- वडील, मामा-मामी, सासू-सासरे, दीर जाऊ नवऱ्यासह दहा लोकांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली

रोहित सुटला अन् कृष्णा अडकला

बेपत्ता विवाहिता आणि रोहित लांबुटे या दोघांना पोलिसांनी अहमदनगर जिह्यातील निर्मळ पिंप्री येथून ताब्यात घेतले. बेपत्ता विवाहिता अन् तिच्यासोबत रोहित नावाचा युवक सापडला, परंतु यात कृष्णा शेटे हा बालविवाह प्रकरणात अडकला. विवाहितेसोबत सापडलेला रोहित लांबुटे मात्र सुटला.

तक्रार द्यायला गेला अन् आरोपी बनला

बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाचा गुन्ह्यात अडकला असा प्रकार कृष्णा शेटे यांच्या बाबतीत घडला आहे. कृष्णा शेटे यांनी बायको वैष्णवी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु माहिती असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे त्यांनी लपवून ठेवले. यामुळे तक्रार द्यायला गेले अन् आरोपी बनले, अशी गत कृष्णा शेटे यांची झाली आहे.

Back to top button