हिंगोली : शाळेत दररोज हेल्मेट घालून येणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापक देणार बक्षीस | पुढारी

हिंगोली : शाळेत दररोज हेल्मेट घालून येणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापक देणार बक्षीस

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक प्रकाश बंगाळे यांनी हेल्मेट घालण्याबाबत शाळेत जनजागृती सुरू केली आहे. शाळेत येताना दरदिवशी २६ मार्चपर्यंत हेल्मेट घातल्यास प्रत्येक शिक्षकाला १ हजार रुपये, तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हेल्मेट घालण्यास प्रवृत्त केल्यास ५०० रुपये बक्षीस देण्याची घोषणा बंगाळे यांनी केली आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक व शिक्षकांना हेल्मेटबाबत शिक्षण विभागाने कार्यशाळेत सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने चिंचोली जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बंगाळे यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांनी २६ मार्चपर्यंत प्रत्येक दिवशी हेल्मेट घालून शाळेत आल्यास सत्कार करून १ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

यावेळी त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्‍या घरी मोटरसायकल आहे, अशी विचारणा केली. या वेळी सर्वांनीच हात वर केले; परंतु कोणाकडे हेल्मेट आहे, याची विचारणा करताच केवळ चारच विद्यार्थ्यांनी हातवर केले. हेल्मेटमुळे सुरक्षा मिळत असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे हेल्मेट खरेदीचा हट्ट धरावा. तसेच पालकांनी हेल्मेट खरेदी केल्यानंतर २६ मार्चपर्यंत प्रत्येक दिवशी हेल्मेट घालूनच प्रवास केल्यास त्यांना ५०० रुपये बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे प्रकाश बंगाळे ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी हेल्मेट बाबत अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनजागृती केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button