हिंगोली: पंतप्रधान आवास योजनेतील निधीचा गैरवापर; कळमनुरी मुख्याधिकाऱ्याची चौकशी सुरू | पुढारी

हिंगोली: पंतप्रधान आवास योजनेतील निधीचा गैरवापर; कळमनुरी मुख्याधिकाऱ्याची चौकशी सुरू

कळमनुरी: पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठेकर यांनी पंतप्रधान आवास योजनेतील निधीचा गैरवापर करून खोटी बिले काढली आहेत. या प्रकरणी मुख्याधिकारी कोठेकर यांनी विनाविलंब कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश चौकशी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करून मुख्याधिकारी कोठेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी कळमनुरी शहर विकास मंचच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कोठीकर यांनी पंतप्रधान आवास योजनेतील ६० लाखांचा निधी अन्यत्र वळवून भ्रष्टाचार केला आहे. तरी त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण खर्चाचे विशेष लेखा परीक्षण करावे. यासाठी कळमनुरी शहर विकास मंचच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. परंतु, यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.

तरी या प्रकरणी सर्व कागदपत्रांची तपासणी करून कोठीकर यांच्याकडून रक्कम तात्काळ वसूल करण्यात यावी. अपहार, खोटी कागदपत्रे तयार करून खोटी देयके काढल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्या घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान देणे बाकी आहे. त्यांना संबंधितांकडून रक्कम वसूल करून तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी शहर विकास मंचाचे नंदकिशोर तोष्णीवाल, दामोदर बाबाराव शिंदे, हफिज खाँ, हूसेन खाँ पठाण यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button