स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पिकविमा कार्यालयात तोडफोड | पुढारी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पिकविमा कार्यालयात तोडफोड

सेनगाव (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांची पिकविम्याची रक्कम न मिळल्‍याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी दुपारी सेनगाव येथील पिकविमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. यावेळी पिकविमा मिळालाच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकर्‍यांनी यावर्षी खरीप हंगामात पिकविमा काढला आहे. सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात जिल्हा प्रशासनानेही शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. त्यानुसार शासनाने शेतकर्‍यांना 154 कोटी रुपयांची मदत जाहिर करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. मात्र पिकविमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसानीनंतरही पिकविमा मिळालाच नाही.

काही ठिकाणी विमा कंपनीच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणात कमी क्षेत्र दाखविले तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शेतात न जाताच स्वतःच शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या केल्याचे प्रकार उघड झाले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्कम देण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले होते. यावेळी 15 दिवसांत मागील वर्षीची 13.89 कोटी रुपयांची रक्कम तसेच यावर्षीची पिकविम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन 23 डिसेंबर रोजी देण्यात आले होते.

दरम्यान, या मुदतीनंतरही पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍याला पिकविम्याबाबत माहिती विचारली असता त्याला योग्य उत्तरे देता आली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी पिकविमा कंपनीच्या कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली तसेच बोर्डही फेकून दिला तर टेबल कार्यालया बाहेर फेकून दिले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला 15 दिवसांची दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे आज सेनगाव कार्यालयात विचारण्यासाठी गेलो होतो, मात्र तेथे उडवा उडवीची उत्तरे मिळाली. आता पिकविम्याच्या मागणीसाठी 15 जानेवारी पासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे नामदेव पतंगे यांनी सांगितले.

.हेही वाचा 

डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन, विविध रंगांनी सजके शहर

नाशिक-शिर्डी मार्गावर अपघात, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर

आमदार सुनील केदार यांना १ वर्षाची शिक्षा; महावितरण कर्मचाऱ्यांना केली होती मारहाण

 

Back to top button