हिंगोलीत जनावरे तस्‍करांची पोलिसांवर दगडफेक; एक पोलिस जखमी | पुढारी

हिंगोलीत जनावरे तस्‍करांची पोलिसांवर दगडफेक; एक पोलिस जखमी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : वसमत ते नांदेड मार्गावर साई मंदिराजवळ गाईंची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीने आज (शनिवार) पहाटे 5 वाजता गस्तीवर असलेल्या वसमत शहर पोलिसांच्या पथकावरच दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत एक राऊंड फायर केला. त्यामुळे तस्कर पिकअप वाहनासह पळून गेले. त्यांचा भरधाव वेगातील पिकअप लिमगाव शिवारामध्ये उलटले. तेथून पळ काढण्यात पाच जणांना यश आले. पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

वसमत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार शिवाजी पतंगे, बेटकर, भोकरे तुपकर व गारोळे यांचे पथक गस्तीवर होते. आज (शनिवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गस्तीपथक वाहनासह वसमत पोलिस ठाण्यामध्ये येत होते. यावेळी पोलिसांचे वाहन पाहताच एक पिकप व्हॅन भरधाव वेगात नांदेडकडे वळले. यामुळे पोलिसांच्या पथकाला संशय आला. त्‍यामुळे पोलिसांनीही वाहनाचा पाठलाग सुरू केला. पिकअप चालकाने त्याचे वाहन नांदेड रोडवर साई मंदिर जवळ थांबवले.

त्यामुळे पोलिसांनीही वाहन थांबून पिकअप जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिकअपमधील पाच जणांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमध्ये जमादार शिवाजी पतंगे जखमी झाले. या प्रकारानंतर उपनिरीक्षक खार्डे यांनी दगडफेक रोखण्यासाठी हवेत एक राऊंड फायर केला. यामुळे घाबरलेल्या तस्करांनी वाहनासह पळ काढला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. तस्करांच्या वाहनाने नांदेड जिल्ह्यातील लिमगाव शिवारात एका टेम्पोला धडक दिली. या अपघातामुळे पिकप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या खाली उलटले. त्यानंतर पिकअपमधील पाचही जणांनी तिथून पळ काढला.

पोलिसांचे पथक तेथे पोहोचल्यानंतर वाहनामध्ये पाच गायी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या गायी वसमत येथे आणल्या आहेत. तर, जखमी झालेल्या जमादार पतंगे यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पोलिसांच्या पथकाला आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शंकर हेंद्रे, प्रशांत मुंढे, भगीरथ सवंडकर यांच्यासह वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक लिमगाव परिसरात आरोपींचा शोध घेत आहे. तसेच, या घटनेची माहिती नांदेड पोलिसांनाही देण्यात आली आहे.

लिमगाव शिवारामध्ये उलटलेल्या या पिकअप वाहनावर समोरच्या बाजुने औरंगाबाद पासिंग तर पाठीमागच्या बाजूने नांदेड पासिंगचा क्रमांक आहे. त्यामुळे हे वाहन चोरीचे असावे, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. तसेच तस्करी होत असलेल्या गायी वसमत येथील असाव्यात, अशी शक्यताही पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button