India-Pakistan Cricket : भारत-पाकिस्‍तान क्रिकेटवर परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे विधान, “जर कोणी तुमच्‍या डोक्‍यावर बंदूक …” | पुढारी

India-Pakistan Cricket : भारत-पाकिस्‍तान क्रिकेटवर परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे विधान, "जर कोणी तुमच्‍या डोक्‍यावर बंदूक ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमध्‍ये होणार्‍या आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धेत भारत सहभागी होणार नाही, असे नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्‍पष्‍ट केले होते. ( India-Pakistan Cricket )  यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आद‍‍‍ळआपट केली होती. यावर आता भारताचे परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही मोठे विधान केले आहे. त्‍याचबरोबर सीमेवरील दहशतवादावरही पाकिस्‍तानला खडेबोलही सुनावले आहेत.

India-Pakistan Cricket : तुमचा शेजारी उघडपणे …

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एस. जयशंकर म्‍हणाले की, “क्रिकेटमध्‍ये विविध स्‍पर्धा होत राहतात आणि तुम्‍हालाही याबाबत केंद्र सरकारची भूमिका माहिती आहे. भारत आणि पाकिस्‍तानमधील क्रिकेट संबंध ही एक गुंतागुंतीची बाब आहे. जर तुमच्‍या डोक्‍यावर बंदुक ठेवली तुम्‍ही चर्चा कशी करणार?, तुमचा शेजारी उघडपणे दहशतवाद्याचे समर्थन करणार असेल तर चर्चा कशी होणार?. आता दहशतवादाचा नेता कोण, त्‍याचे अड्डे कोठे आहेत? हे गुपित राहिलेले नाही.  शेजारचा देश दहशतवादाला खतपाणी घालत असेल तर ही सामान्‍य बाब नाही”, असे सांगत त्‍यांनी अप्रत्‍यक्षपणे भारतीय क्रिकेट संघ पाकिस्‍तानमध्‍ये जावून क्रिकेट खेळणार नाही, असे स्‍पष्‍ट केले.

ऑक्‍टोबर महिन्‍यात ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी स्‍पष्‍ट केले होते की, भारतीय संघ पाकिस्‍तान दौर्‍यावर जाणार नाही. ही स्‍पर्धा अन्‍यत्र घेण्‍यात यावी, असेही त्‍यांनी सुचवले होते. केंद्र सरकारबरोबर चर्चा केल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील सामन्‍याबाबत निर्णय होईल, असे बीसीसीआयच्‍या पदाधिकार्‍यांनी म्‍हटलं होतं.

नुकतेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रमुख रमीज राजा यांनी सांगितले होते की, भारतीय क्रिकेट संघ स्‍पर्धेत पाकिस्‍तानमध्‍ये होणार्‍या आशिया चषक स्‍पर्धेत सहभागी झाला नाही तर पाकिस्तान विश्‍वचषक २०२३ मधून माघार घेण्‍याचा विचार करु शकतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button