

बंगळुरू; वृत्तसंस्था : जगभरातील सुमारे ५० लाख लोकांचा डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बॉट मार्केट म्हणजेच डिजिटल चोरबाजारात विकला गेला आहे. यामध्ये ६ लाख भारतीयांचा समावेश आहेत. नॉर्डव्हीपीएन या जगातील सर्वात मोठ्या व्हीपीएन सेवा पुरविणाऱ्या कंपनीने ही माहिती दिली.
बॉट मालवेअरच्या माध्यमातून पीडीत व्यक्तींच्या डिव्हाइसमधून हॅकर्सनी चोरलेला डेटा बॉट मार्केटमध्ये विकला जातो. चोरी झालेल्या या डेटामध्ये वापरकर्त्यांचे लॉगिन, कुकीज, डिजिटल फिंगरप्रिंट स्क्रीनशॉट आणि इतर माहिती यांचा समावेश आहे. अशा एका माहितीची किंमत सरासरी ४९० रुपये (५.९५ डॉलर) इतकी असते. २०१८ मध्ये बॉट मार्केट सादर झाल्यापासूनचा मागील चार वर्षांचा डेटा नॉर्डव्हीपीएनने ट्रॅक केला आहे.
भारतात सायबर सुरक्षेशी निगडित अनेक समस्या आढळतात. अलीकडेच गेल्या महिन्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स ) या रुग्णालयाचा सर्व्हर हॅक करण्यात आला होता. या रुग्णालयात अनेक दिग्गज व
महत्त्वाच्या पदांवरील अधिकारी, नेते, उद्योजक उपचार घेत असतात. त्यांची व्यक्तिगत माहिती महत्त्वपूर्ण असते. त्या दृष्टीने हा सर्व्हर हॅक होणे ही अत्यंत गंभीर बाब होती. एम्सवरील रॅन्समवेअर हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयसीएमआर) २४ तासांच्या आत सुमारे हॅकिंगचे ६,००० प्रयत्न झाले.
नॉर्डव्हीपीएनच्या अभ्यासकांना ६६ कोटी कूकीज, ८१ हजार डिजिटल फिंगरप्रिंट्स, ५ लाख ३८ हजार ऑटो-फिल फॉर्म्स, असंख्य डिव्हाईस स्क्रीनशॉट्स आणि वेबकॅम स्नॅप्स एवढा ऐवज सापडला आहे. तसेच जेनेसिस मार्केट, रशियन मार्केट आणि टूइजी या तीन मार्केट्समध्ये गूगल, मायक्रोसॉफ्ट व फेसबुक यांचे चोरलेले लॉगिन आढळल्याचे नॉर्डव्हीपीएनच्या अभ्यासात नमूद आहे.