Uddhav Thackeray | सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत साहित्यिकांनी जनतेला द्यावी : उद्धव ठाकरे | पुढारी

Uddhav Thackeray | सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत साहित्यिकांनी जनतेला द्यावी : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : खोक्याचे राजकारण करायचे असेल, तर लोकशाही संपली, असे जाहीर करा. जनतेच्या मतांची किंमत भावनेत व्हायला हवी, खोक्यांमध्ये नको. जनतेने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. हा जाब विचारण्याची हिंमत साहित्यिकांनी जनतेला दिली पाहिजे, आज स्वातंत्र्य टिकविण्याची गरज असून साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (दि.१०) केले. घनसावंगी येथे आयोजित ४२ व्या मराठावाडा साहित्य संमेलनात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले की, जनतेचे कामे करण्यासाठी आम्ही मते मागतो. परंतु सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाहीत, तर निवडून देण्यासारखे लोकप्रतिनिधींना परत बोलविण्याचा अधिकार जनतेला दिला पाहिजे. सरकार न्यायपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, खरं बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. देशात लोकशाही रूजली आहे का ?, असा सवाल करून अशी जीवघेणी लोकशाही असेल, तर बदल करायला हवा. परिसंवादाला अर्थ नाही, तर कृती केली पाहिजे. चर्चा करून काहीही उपयोग होणार नाही, रस्त्यावरून उतरून कृती करावी लागेल, असे ते म्हणाले.

गाव हे आपले मूळ आहे. ते मजबूत झाले पाहिजे, तर आपली प्रगती होईल, त्यासाठी ग्रामीण साहित्य जास्तीत जास्त निर्माण झाले पाहिजे. ही जबाबदारी साहित्यिकांनी घेतली पाहिजे, असे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्र- कर्नाटक राज्यात सीमा प्रश्नावरून वातावरण तापले आहे. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकविषयी आपली भूमिका जाहीर करावी. कर्नाटकात मराठी बांधवांची मुस्कटदाबी केली जात आहे. याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पंतप्रधानांनी सुनावले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

राज्यात महिलांचा अवमान करणारे मंत्री असतील, तर आदर्श काय घेणार? अशी टीका राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता ठाकरे यांनी यावेळी केली. आमच्या आदर्शाचा अवमान केलेला आम्हाला चालणार नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केलाच पाहिजे, असे ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठणकावून सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button