कोल्हापूरला लग्नाला गेलेल्या कंत्राटदाराचा बंगला फोडला | पुढारी

कोल्हापूरला लग्नाला गेलेल्या कंत्राटदाराचा बंगला फोडला

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : नातीच्या लग्नासाठी कुटुंबियांसह कोल्हापुरला गेलेल्या कंत्राटदाराचा भरदिवसा बंगला फोडून चोरी झाली. चोरट्याने तब्बल साडेआठ तोळे सोने, पावणेदोन लाखांची रोकड आणि चांदीचे साहित्य, असा सहा लाखांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही फुटेजवरून २९ नोव्हेंबरला झालेली ही चोरी गुरुवारी (दि. १) ही उघडकीस आली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी अवधूत चव्हाण (वय 68, रा. प्लॉट नं. 170, अजयदिप कँम्पलेक्स जवळ, सिडको) यांच्या घरी ही चोरी झाली. ते कंत्राटदार आहेत. २७ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता ते कुटुंबियांसह कोल्हापूर येथे नातीच्या लग्नासाठी गेले होते. त्यांच्या बंगल्याच्या परिसरात चारही बाजुंनी सीसीटीव्ही आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. १) चव्हाण कुटुंबिय माघारी परतले. तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले.

७ तोळ्याच्या सोन्याच्या सहा बंगड्या, पाच ग्रॅमची डायमंड रिंग, तीन ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमची अंगठी, चांदीचे दोन ताट, तीन वाट्या, चांदीचा करंडा, समई, चांदीचे लक्ष्मी यंत्र आणि एक लाख ७० हजार रुपये रोकड, असा जवळपास सहा लाखांचा ऐवज चोरट्यांने लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच चव्हाण कुटुंबियांनी पुंडलिकनगर पोलिसांना याची फिर्याद दिली. पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास उपनिरीक्षक व्ही. जी. घोडके करीत आहेत.

अशी झाली चोरी

एन- ३ मध्ये शिवाजी चव्हाण यांचा मोठा बंगला आहे. पाठीमागे मनपाचे टेनिस कोर्ट आहे. मुख्य रोडवरील संरक्षक भिंतीवरून चोरटा उडी मारून आत गेला. त्याच बाजुने तो सरळ पाठीमागे गेला. मागील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॅच लॉक असल्याने ते शक्य झाले नाही. चोरट्याने टिकावाने मागील खिडकी तोडली. ग्रील उचकटून काढली आणि त्यातून तो घरात घुसला. त्यानंतर तळमजल्यातील देवघर व कपाटातील ऐवजावर डल्ला मारला. त्यानंतर चोरटा वरील मजल्यावर गेला. तेथेही देवघर आणि कपाटातील ऐवजावर डल्ला मारून तो पुन्हा आलेल्या रस्त्यानेच बाहेर पडला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला.

दीड तास चोरटा बंगल्यात

भरदुपारी बंगला फोडलेला चोरटा पूर्णवेळ तोंडाला रुमाल बांधून होता. त्याने एकदाही रुमाल सोडला नाही. धक्कादायक म्हणजे, भररस्त्यावरील या बंगल्यात तो तब्बल दीड तास होता. तरीही कोणालाच साधी खबरही लागली नाही. त्याने बंगल्यातील दोन्ही मंजल्यावरील जवळपास पाच ते सहा कपाटांमधील सामानाची फेकाफेक केली. सहा लाखांचा ऐवज साध्या पिशवीत टाकून घेऊन गेला. ज्या टिकासने खिडकी फोडली तो किचनमध्ये टाकून चोरटा पसार झाला.

Back to top button