महावितरणचे आश्वासन लोकप्रतिनिधींच्या दारी मात्र, वीज नाही ग्राहकांच्या घरी | पुढारी

महावितरणचे आश्वासन लोकप्रतिनिधींच्या दारी मात्र, वीज नाही ग्राहकांच्या घरी

जवळाबाजार ; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्याला पिकासाठी वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश राज्य शासनाकडून महावितरणला दिले आहेत. असे असताना देखील येथील उपकेंद्रातून २४ तासांत फक्त २ किंवा ३ तास वीजपुरवठा सुरू असतो. त्यातही वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे परिसरातील लोकप्रतिनिधींकडून महावितरण जवळा बाजार व परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एकाच दिवशी २ लेखी निवेदने दिली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर २५ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला होता. परंतु, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी महावितरणचे अधिकारी गायके यांनी येथील उपकेंद्रात सकाळी ११ वाजता निवेदन देणाऱ्या लोकप्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले आणि फक्त आश्वासने दिली.

यावेळी जवळा बाजार परिसरातील वीजपुरवठा हा क्षमतेपेक्षा जास्त पुरवठा करावा लागत आहे. परिसरात बागायतदार क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच जवळाबाजार येथील वीज पुरवठा कुरुंदा येथून सुरळीतपणे मिळत नाही. यामुळे दररोजच वीजपुरवठा खंडित होणे कायम आहे. या गंभीर बाबीची दखल घेण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पण महावितरणकडून मागील दहा वर्षांपासून परिसरातील लोकप्रतिनिधीनी लेखी आंदोलनाचा इशारा देणे आणि त्यास आश्वासनाचे संदेश देणे ही परंपरा आज सुद्धा पहावयास मिळाली आहे.

तात्काळ जवळाबाजार येथील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी चर्चेमधून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण येथे १३२ केंद्राची मान्यता मागील वीस वर्षापासून राज्य शासनाच्या दरबारी धूळखात पडलेली आहे. पण या गंभीर बाबीकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा नसल्याने हा प्रश्न मार्गी लागला नाही. महावितरणकडून वसमत तालुक्यातील गुंडा येथील उपकेंद्र मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्याची आम्ही आगामी काळात दुरुस्ती करणार आहोत आणि  राज्य शासनाकडून औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा येथे उपकेंद्र नुकतेच मंजूर झाले असून हे उपकेंद्र आगामी काळात कधी पूर्ण होईल यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. याच दरम्यान महावितरणकडून केवळ जर आणि तरचे आश्वासन आज सुद्धा लोकप्रतिनिधीस देण्यात आले आहेत. यामुळे २५ नोव्हेंबर रोजी होणारा रास्ता रोकोचा आंदोलन रद्द करण्यात आले आहे.

एकंदरीतच जवळा बाजार परिसरात लोकप्रतिनिधींकडून केवळ आंदोलनाचा इशारा आणि आंदोलनाच्या एक दिवस अगोदर महावितरणचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लवकरच प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देण्याची परंपरा आज सुद्धा पहावयास मिळाली आहे. यावरून महावितरणकडून लोकप्रतिनिधीच्या दारी आश्वासन आणि ग्राहकांच्या घरी वीज पुरवठा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button