पुणे : अट्टल वाहन चोरट्याला अटक; 21 गुन्ह्यांचा छडा | पुढारी

पुणे : अट्टल वाहन चोरट्याला अटक; 21 गुन्ह्यांचा छडा

पुणे; पुढारी वृत्तेसवा : पुणे शहर व जिल्ह्यातून वाहनांची चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका(दोन)ने अटक केली. त्याच्याकडून 20 दुचाकी व एक चारचाकी अशी 6 लाख 17 हजारांची 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. सुरेश संभाजी वाघमारे (वय 28, रा. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने हडपसर, लोणीकंद, लोणी काळभोर, विमानगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, यवत आणि सासवड परिसरातून वाहने चोरी केल्याच समोर आले आहे.

शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. हडपसर परिसरातील वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलिस नाईक शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे यांना दुचाकीचोराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत त्याने शहर व ग्रामीण परिसरातून 21 वाहने चोरल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अशोक आटोळे, विनायक रामाणे यांनी ही कारवाई केली.

Back to top button