Pakistan: आता ‘यांच्या’ हाती पाकिस्तानी लष्कराची सुत्रे, पंतप्रधान शरीफ यांच्याकडून नावाची घोषणा | पुढारी

Pakistan: आता 'यांच्या' हाती पाकिस्तानी लष्कराची सुत्रे, पंतप्रधान शरीफ यांच्याकडून नावाची घोषणा

पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी पाकिस्तानचे नवीन लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष म्हणून लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नावाची घोषणा केली आहे. या संबंधीची माहिती पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली आहे.

नवनिर्वाचित लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेणार आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा (६१) हे तीन वर्षांची मुदतवाढ मिळाल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कडून पाकिस्तानच्या नवीन लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांना फोर स्टार जनरल म्हणूनही बढती देण्यात आली आहे. या नियुक्त्यांना आता राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या संमतीची प्रतीक्षा आहे. पाकिस्तानी लष्कराच्या 75 वर्षांच्या अस्तित्वात देशावर राज्य करणारे लष्कर म्हणून पाहिले जाते. पाकिस्तानी लष्कराकडे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत मोठी ताकद असल्याचेही मानले जाते.

Back to top button