औरंगाबाद : थर्माकोलच्या तराफ्यावर बसून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास (Video) | पुढारी

औरंगाबाद : थर्माकोलच्या तराफ्यावर बसून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास (Video)

गंगापूर; रमाकांत बन्सोड : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतात तालुक्यातील अनेक पुनर्वसन झालेल्या गावातील वसाहतीमध्ये जाण्यासाठी लोकांना जुन्याच साधनसामुग्रीचा आणि तराफ्याचा वापर करावा लागत आहे. भिवधानोरा येथील शाळेत जाण्यासाठी लहान मुले थर्माकोलच्या तराफ्यावर बसून जीव धोक्यात घालून शाळेत ये- जा करतात.

गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदी काठी असलेला भिवधानोरा शिवारातील काही भाग हा शिवनानदी च्या पलीकडे आहे. जायकवाडी धरण झाल्यामुळे जायकवाडी बॅक वॉटरचे पाणी नदीकाठी सर्वत्र पसरते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना रोज धरणाच्या या पाण्यातून शाळेसाठी, शेती कामासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यातही वारे जास्त वाहत असल्याल पालक शिक्षकांना मेसेज पाठवून आज वारे जास्त वाहत असल्याने पाण्याच्या लाटा वाढत आहे. त्यामुळे मुले शाळेत येऊ शकत नाही, असा मेसेज टाकतात. आज (दि.१६) असाच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.

गंगापूर तालुक्यातील २२ गावे ही जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. जवळजवळ ४५ वर्षे झाले तरीही शासनाने मूलभूत सुविधा अद्याप या गावांना दिलेल्या नाहीत. भिवधानोरा या गावातील काळे, चव्हाण, घोटकर, लवघळे कुटुंबासह अनेक शेतकऱ्यांची शेती सोना नदीच्या पलीकडे आहे. तर अनेक शेतकरी अडचणीमुळे तेथेच वस्ती करून राहतात. आपण शिकलो नाही, परंतु आपली मुलं शिकली पाहिजे, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी जीव धोक्यात घालून थर्माकोलच्या ताफ्यावर बसवून शाळेत पाठवतात.

या भागातील कोडापूर, मांगेगाव शिवारा पलीकडून येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मुलांना पाण्यातून शाळेत जावे लागत आहे. तालुक्यातील गोदावरी काठावरील पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांतील मुलांना दररोज अशाच पद्धधतीने शाळेमध्ये जावे लागते. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी थर्माकोलवर बसून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. तरीही आजही ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रस्ते नाहीत. यामुळे जीव धोक्यात घालून लहान मुलांसह नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष देणे गरजचे आहे.
– भाऊसाहेब शेळके, सामाजिक कार्यकर्ता

 

हेही वाचलंत का ?  

Back to top button