हिंगोली: पिंपळदरी येथे ऐन गणेशोत्सवात अंधाराचे साम्राज्य | पुढारी

हिंगोली: पिंपळदरी येथे ऐन गणेशोत्सवात अंधाराचे साम्राज्य

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील आदिवासी बहुल व पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या पिंपळदरी येथे गेल्या आठ दिवसापासून तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन गौरी गणपती उत्सवाच्या काळात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय भुरके यांनी वीजपुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टेंभुर्जरा येथील 33 केवी वीज उपकेंद्रातून पिंपळदरी येथे वीजपुरवठा होतो. या सबस्टेशन अंतर्गत एका फिटरवर जामगव्हाण, कंजारा, आमदरी, राजदरी, सोनवाडी, पूर्व वसई अशी गावे आहेत. दुसऱ्या फिडरवर पिंपळदरी, जलाल दाबा, फुलदाधाबा, काकड दाबा अशी गावी आहेत.

पिंपळदरी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत उपकरणे सुरू होत नाहीत. पिठाच्या गिरण्या बंद असून ग्रामस्थांना दळण दळण्यासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. कमी अधिक दाबामुळे टीव्ही, पंखे, मोटारी, फ्रीज आदी उपकरणे जळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. संजय भुरके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यास वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती केली असता हिंगोली येथे संपर्क साधण्यास सांगण्यात आले. वीज बिल वसुलीसाठी ज्याप्रमाणे सक्ती केली जाते. त्याप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. तरी त्वरित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास दांडके आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय भुरके यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button