हिंगोली: सव्वातीन लाख नवसाचे मोदक वाटण्याचा विघ्नहर्ता चिंतामणी मंदिर संस्थानचा निर्णय (Video) | पुढारी

हिंगोली: सव्वातीन लाख नवसाचे मोदक वाटण्याचा विघ्नहर्ता चिंतामणी मंदिर संस्थानचा निर्णय (Video)

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीमधील गड्डेपीर गल्‍लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या नवसाच्या मोदकाची महाराष्ट्रासह देशभरात ख्याती आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा मंदिर संस्थानकडून तब्बल सव्वातीन लाख मोदक वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, ९ सप्टेंबर रोजी भक्‍तांना मोदकाचे वाटप केले जाणार आहे.

अनंत चतुर्दशी दिवशी मोदक वाटप केले जाणार आहेत. संस्थानच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून, शेवटच्या काही दिवसांत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहरात मोठा पेंडॉल टाकण्यात आला आहे. तसेच दर्शन रांग सुलभ करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात असल्याचे विघ्नहर्ता चिंतामणी मंदिर संस्थानचे सचिव दिलीप बांगर यांनी सांगितले.

नवसाचा मोदक घेण्यासाठी चिंतामणी गणपतीला अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. मात्र, कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षापासून याठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांवर परिणाम झाला होता. यावर्षी मात्र कोणतेच निर्बंध नसल्याने उत्साहात सर्व कार्यक्रम होणार आहेत. यावेळी संस्थानकडून सव्वातीन लाख मोदक तयार करण्यात आले आहेत. या मोदकांच्या पॅकिंगचे काम सध्या सुरू आहे. याठिकाणी येऊन नवसाचा एक मोदक घेऊन गेल्यानंतर नवस पूर्ण झाल्यास पुढच्या वर्षी गणेशोत्सवात १०१ मोदक वितरीत करण्याची परंपरा आहे. ज्यांची मनोकामना पूर्ण होते अशा भाविकांकडून हे मोदक वितरीत केले जातात.

यावर्षी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी गणेशोत्सवातील पहिल्या दिवसांपासूनच हे चित्र आहे. सायंकाळपर्यंत दर्शन रांगा दिसत आहेत. याठिकाणी येणार्‍या भाविकांना पिण्याचे पाणी तसेच भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्यातूनच नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगना आदी राज्यातून भाविक याठिकाणी येत असतात.

हे वाचलंत का?

Back to top button