आंतरराज्यीय टोळीने महिलांना घातला गंडा; जुने कपडे घेऊन नवीन देण्याचे दाखवले आमिष | पुढारी

आंतरराज्यीय टोळीने महिलांना घातला गंडा; जुने कपडे घेऊन नवीन देण्याचे दाखवले आमिष

परंडा, पुढारी वृत्तसेवा : जुने कपडे आणि काही रक्कम घेवून आम्ही आपणास नवीन सतरंजी, बेडशीट, गालिच्छे, सोपासेट कव्हर, पडदे अशा विविध प्रकारच्या नवीन वस्तू बनवून देतो. अशी थाप मारून महिलांना हजारो रूपयांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी परंडा शहरासह तालुक्यात सक्रीय असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील एक निवेदन अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात दिले आहे.

उत्तर प्रदेश राज्यामधील सहा जणांच्या टोळीने मोटारसायकलवर शहरात फिरून जुनी कपड्याच्या मोबदल्यात सतरंजी, चादर, बेडशीट, सोपासेट कव्हर, गालिचे, पडदे अशा विविध प्रकारची नवीन रंगीबेरंगी बनवून देतो. आमचा कारखाना बार्शीनजीक आहे. जुन्या कपड्यासोबत अर्ध्या रक्कमा या टोळीने महिलांकडून घेतल्या. राहिलेली अर्धी रक्कम आम्ही तुम्हाला तुमचे नवीन कपडे आठ दिवसांत आणून दिल्यानंतर द्या, असे सांगितले.

महिलांना दाखविण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे नवीन सतरंजी, बेडशीट पडदे अशा विविध प्रकारची मोटारसायकलवर घेऊन आले होते. ते पाहून महिला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जुनी कपडे व अर्धी रक्कम दिली. मात्र दहा दिवस उलटून गेले. तरी त्या लोकांचा मोबाईलही लागत नाही आणि ते परत आलेही नाही. त्यांनी फसवणूक केली असल्याचे महिलांच्या लक्षात आले. एका युवकाने टोळीतील एकाचा आधार कार्ड व दुचाकीवरील क्रमांकासह त्याचा फोटो घेतला. त्यांचा आधारकार्ड क्रमांक उपलब्ध असून मात्र तो चुकीचा आहे. दुचाकी क्रमांकही चुकीचा आहे.

याप्रकरणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचारविरोधी समितीचे मराठवाडा सचिव फारूक शेख ,जमीर शिकलकर, अमित आगरकर, विजय मेहेर, करीम शेख, राजेश गायकवाड, जावेद शेख , सलीम करपुडे, तोफिक मुजावर, आदित्य बारस्कर, मस्तकीम शेख यांच्या शिष्टमंडळाने परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्याकडे तक्रार दिली आहे.

Back to top button