मंत्रालयात जातो म्हणून गेले अन् चार दिवसांत आमदार बनून आले; विनायक मेटे यांचा प्रेरणादायी प्रवास | पुढारी

मंत्रालयात जातो म्हणून गेले अन् चार दिवसांत आमदार बनून आले; विनायक मेटे यांचा प्रेरणादायी प्रवास

बीड : बालपणीचे मित्र आणि सहकारी कामगार असलेले तुकाराम धोंडीबा येळवे यांनी विनायक मेटे यांचा राजेगाव ते विधानभवन हा प्रवास कसा झाला? मुंबईत कधी गेले अन् कुठे काम केले? मराठा महासंघाशी कसे जोडले गेले? संघर्षाच्या काळात अन् पुढे आमदार झाल्यानंतरही मित्र असलेल्या येळवे यांनी सांगितलेला विनायक मेटे यांचा केज तालुक्यातील राजेगाव ते विधानभवन हा प्रवास त्यांच्याच शब्दांत..

बीड : राजेगाव  येथील अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात विनायक मेटे यांचा जन्म झाला. त्यांची मावशी कोटी (ता. केज) येथे असल्याने बालपणापासून त्यांचे कोटी येथे येणे- जाणे होते. कोटीचे मावसभाऊ श्रीमंत डोंगरे 1979 साली मुंबईला गेले. शिक्षण कमी अन् व्यवसायिक कौशल्य नसल्यामुळे शापुर्जी आणि पालनजी कंपनीने रंग देण्याचे कंत्राट घेतलेल्या महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीत ते काम करू लागले. रंग देण्याचे काम हिवाळा आणि उन्हाळ्यातच सुरू असते.

पावसाळ्यात काम बंद असल्याने श्रीमंत डोंगरे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात गावी येत अन् दसरा होताच परत मुंबईला जात असत. 1981 साली काम वाढले आणि कामगार कमी म्हणून शापुर्जी आणि पालनजी कंपनीने डोंगरे यांना आणखी काही मुले असतील तर पावसाळ्यानंतर घेऊन ये असे सांगितले. दरम्यान श्रीमंत डोंगरे यांच्यासोबत वयाच्या 18 व्या वर्षी विनायक मेटे, त्यांचे मोठे बंधु त्रिंबक मेटे, भरत डोंगरे, तुकाराम येळवे, पांडुरंग डोंगरे, उत्तम डोंगरे, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग बहीर, बबन शिनगारे असे 35 युवक मुंबईला गेले. यावेळी शापुर्जी आणि पालनजी कंपनीचे महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीला (मशीद बंदर, मुंबई) शेडला पेंट मारण्याचे काम मिळाले होते. भिंती, पत्र्याचे शेड याला रंग देणार्‍या कामगारांना 1 रूपया हजेरी मिळत असे. बीड जिल्ह्यातील 35 युवक कामगारांसोबत विनायक मेटे यांनी महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीत दोन वर्षे काम केले. 1982 ला शापुर्जी आणि पालनजी कंपनीला चेंबुर येथे आरसीएफ कंपनीचे कलरचे काम मिळाले. येथे दोन वर्षे काम केले.

यानंतर एनआरसी कंपनी (आंबेवली, कल्याण) येथे 4 वर्षे कलरचे काम केले. येथून जवळच मोहनागेट नावाचे छोटे गाव होते. विनायक मेटे यांच्यासह 35 कामगार या गावातच किरायाच्या घरात तात्पुरते स्थायिक झाले. यांनतर ते सर्वजन मोहनागेट गावात 1996 पर्यंत वास्तव्यास होते. मोहनागेट गावात वास्तव्यास असताना पॉली मिल पेंट, पिवर पेंट, मुलंड येथील जोशी अ‍ॅन्ड जोशी या कंपनीच्या माध्यमातून ते रंगकाम करत असत. रंग कामगार म्हणून काम करत असले तरी विनायक मेटे खूप चंचल होते. सामाजिक प्रश्‍नांची त्यांना जाण असायची. अन्याय- अत्याचाराबद्दल ते पेटून उठायचे. मराठा समाजाच्या प्रश्‍नावर ते आवेशाने बोलायचे. मराठा समाजाच्या प्रश्‍नावंरील आंदोलने, मोर्चा यात ते सहभागी व्हायचे. 1981 पासून मुंबईत कामाला असताना पावसाळ्यात त्यांना 4 महिने गावी जावे लागत असे. गावी असताना मुंबईत काम करणार्‍या सर्व 35 कामगारांची अधून- मधून केज येथे भेट व्हायची.

आमदार विनायक मेटे मुलंडमध्ये कामाला असताना नुकतीच अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना झाली होती. राज्यात सर्वत्र मराठा महासंघाचे काम सुरू होते. याच काळात योगायोगाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. केजच्या शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यक्रम होता. त्यावेळी कोटी, मस्साजोग, नांदुरघाट, राजेगाव या गावातून केजला ये- जा करण्यासाठी एकमेव केज- बोरगाव ही बस असायची. केज येथील शासकीय विश्रामगृहाजवळ बस थांबत असल्याने प्रवासी तिथे बसच्या प्रतिक्षेत थांबायचे. एके दिवशी विनायक मेटे आणि त्यांचे मुंबईतील सात-आठ कामगार मित्र बसच्या प्रतिक्षेत थांबले होते. यावेळी विश्रामगृहात गर्दी दिसली. एवढी गर्दी का? काय झाले म्हणून उत्सुकतेपोटी विनायक मेटे आणि त्यांचे मित्र आत गेले. तिथे अंबाजोगाईचे भगवान लोमटे (मराठा महासंघाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष) यांचे भाषण सुरू होते. सर्वांनी अर्धा तास उभे राहून भाषण ऐकले.

मुंबईतील सर्व कामगार मित्रांपैकी एकमेव विनायकराव मेटे हे मॅट्रीक पास असल्याने सर्वजन त्यांना मान- सन्मान देत असत. लोमटे यांचे भाषण झाल्यानंतर विनायक मेटे व त्यांच्या सहकार्‍यांनी भगवान लोमटे यांची भेट घेतली. आम्ही 35 मुंबईत असतो असे सांगत मराठा महासंघात काम करण्याची ईच्छा असल्याचे ते म्हणाले. यावेळी भगवान लोमटे यांनी दोन दिवसांनी अंबाजोगाईला या असे सांगितले.

लोमटे यांनी बोलवले परंतु सर्वांना अंबाजोगाईला जायला जास्त खर्च लागेल, म्हणून कोणीतरी एकाने जायचे ठरले. यानंतर सर्व कामगारांनी विनायक तूच जा, आमच्यापेक्षा तूच जास्त शिकलेला आहेस. तुला चांगले बोलता येते म्हणत त्यांना राजी केले. यावेळी संघटना, राजकारण असल्या भानगडीत कशाला पडायचे? आपण खूप गरिब आहोत असेही काही जण म्हणाले. परंतु आपण एकत्र राहतो. एका कंपनीत काम करतो, आपलेही संघटन हवे असे म्हणत कोणी एक रूपया, कोणी पन्नास पैसे तर कोणी 20 पैसे असे दहा रूपये गोळा केले. ते पैसे विनायक मेटे यांना अंबाजोगाईला जाण्यासाठी दिले. अंबाजोगाईत भेट घेतल्यानंतर भगवान लोमटे विनायक मेटे यांच्यावर प्रभावित झाले. मुंबईत कुठे काम करता? कुठे रहाता? असे प्रश्‍न विचारून त्यांनी काही ठिकाणांची नावे विचारली. त्याची उत्तरे विनायक मेटे यांनी दिली. यानंतर लोमटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष शशिकांत पवार यांना पत्र लिहिले. त्या पत्रात माझ्या गावाकडची मुले फार गरीब आहेत. ते मुंबईत कामाला असतात. त्यांना संघटनेच्या कामाची आवड आहे. यातील विनायक नावाचा मुलगा संघटना जोमाने पुढे नेऊ शकतो, असा मजकुर लिहीला अन् ते पत्र विनायक यांच्याकडे दिले.

दरम्यान पावसाळा संपला अन् विनायक मेटे यांच्यासह 35 कामगार मुंबईला गेले. परंतु लोमटे यांनी दिलेले पत्र कसे आणि कधी द्यायचे? त्यांची भेट कशी घ्यायची? असा प्रश्‍न त्यांना पडला होता. यावर चर्चा व्हायच्या, परंतु मार्ग निघत नसल्याने मुंबईत गेल्यानंतर महिनाभर पत्र तसेच पिशवीत पडून होते. यावेळी पुन्हा एक योग जुळून आला. विनायक मेटे व त्यांचे सर्व सहकारी काम करत असलेल्या जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीला मंत्रालयाच्या समोर कॉमनवेल्थ बिल्डींगच्या कलरचे काम मिळाले. मोहनागेट गावात राहून सर्व कामगार रेल्वेने कॉमनवेल्थ बिल्डिंगमध्ये कामाला जाऊ लागले. यावेळी मंत्रालयाच्या जवळ आलो आहोत तर शशिकांत पवार यांना भेटून पत्र देऊ असे ठरले. दरम्यान निनायकराव मेटे, तुकाराम येळे, पांडुरंग बहीर, भरत डोंगरे या चौघांनी शशिकांत पवार यांची भेट घेतली. पत्राचा मजकूर वाचून ते प्रभावित झाले. तुमच्यातील एकाचे नाव सांगा जो मला नेहमी भेटेल, संपर्कात राहील असे ते म्हणाले. यावेळी सर्वांनी विनायक मेटे यांचे नाव सांगितले.

मंत्रालयाच्या समोरच काम सुरू असल्याने जशी वेळ मिळेल तसे विनायकराव हे शशिकांत पवार व मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांना भेटत असत. या ठिकाणी नऊ महिने काम सुरू असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाशी विनायक यांचे ऋणानुबंध जुळले. मराठा महासंघाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थित रहात होते. यामुळे मराठा महासंघाशी विनायकमेटेंची नाळ जुळली. संघटनेच्या माध्यमातून ते मराठा समाजाच्या प्रश्‍नावर बोलू आणि आवाज उठवू लागले. मराठा महासंघाचे कार्यक्रम, अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित रहात असत. महासंघाच्या कामात दिवसा वेळ जाऊ लागल्याने मोहनागेट येथील खोलीवर संध्याकाळ ऐवजी सकाळी स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. (त्यावेळी सर्व कामगारांना हाताने स्वयंपाक करावा लागत असे) मजूर म्हणून इकडे रंगकाम करायचे आणि जसा वेळ मिळेल तसे मराठा महासंघाचे काम करायचे, हा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. अनेकवर्षे मजूरी आणि संघटनेचे काम विनायकराव मेटे तन- मनाने करत होते.

दरम्यान, 1995 ला युतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. या काळात विनायक मेटेंचा गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड यांच्याशी संपर्क आला. त्याकाळी जिल्ह्यातील फार कमी लोक मंबईत जात असत. विनायक मेटे मुंबईतच असल्याने त्यांचा गोपीनाथ मुंडे यांच्याशी सतत संपर्क होऊ लागला. या संपर्कात काय झाले कळत नव्हते मात्र आम्ही सर्वजण कामावरून मोहनागेटच्या खोलीवर आल्यानंतर विनायकराव म्हणायचे ‘मी आमदार होणार!’ अन् ते आमदार होणार म्हटले की आम्हाला हसू यायचे. सारे जण पोट धरून हसायचो. विनायक रोज कामावर असतो, मजूर म्हणून आमच्यासोबत रंग देण्याचे काम करतो अन् एखाद्या दिवशी मंत्रालयात जाऊन आल्यावर असे का बोलतो, असा प्रश्‍न सहकारी कामगारांना पडायचा. यामुळे मोहनागेट गावातील खोलीत राहणारे सर्व कामगार त्यांच्यावर हसायचे.

एके दिवशी जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीतील कलरचे काम संपल्यानंतर पगाराच्या निमित्ताने तेथील प्रमुख शरद जोशी यांची भेट झाली. यावेळी विनायक मेटे त्यांना ‘मी लवकरच आमदार होणार आहे’ असे त्यांना सांगितले. पगाराचे तीनशे रूपये हातात घेताना म्हटलेले हे वाक्य ऐकून शरद जोशी खळखळून हसले. ‘विनायक तू आमदार झाला तर मी तुला माझे घर मोफत राहायला देतो.’ असे ते मिश्किलपणे म्हणाले. यानंतर काही काळ गेला अन् एके दिवशी मंत्रालयात जायचे म्हणून विनायक मेटे मोहना गावातून गेले अन् चार- पाच दिवस परत आलेच नाहीत. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. यामुळे कामावर कसे आला नाहीत, हे विचारायची सोय नव्हती. मोहनागेट गावात जिथे विनायक मेटे वास्तव्यास होतो तिथे जवळच किर्ती शहा यांचे चेतना किराणा स्टोअर्स (मोहनागेट, आंबेवली) होते. तिथे लॅन्डलाईन फोन असल्याने ते दुकान आमचा सर्व कामगारांचा कट्टा बनले होते. कोणाला फोन करायचा तर तिथून करत असत आणि आम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर ते चेतना किराना स्टोअर्समधील फोनवर निरोप देत. दिलेला निरोप किर्ती शहा आमच्यापर्यंत पोच करायचे.

विनायक का आला नाही? असा प्रश्‍न आम्हाला पडलेला होता. दरम्यान चौथ्या दिवशी कामावरून आल्यानंतर चेतना किराना स्टोअर्सवर गेलो. दुकानदार किर्ती शहा कुत्सिपणे हसत म्हणाला ‘ओ तुम्हारा विनायक पेंटर का फोन आया था, बोला मै कल आमदार होने वाला हूं, शपथविधी है. एक फोन नंबर दिया है. उसपर फोन करके तुम्हे मंत्रालय बुलाया है’ असे म्हणत तो शेवटी खुप मोठ्याने हसला. ‘ए सही है क्या?’ म्हणत तो पुन्हा आमच्याकडेच डोळे मोठे करून पाहू लागला. यामुळे कोणता फोन नंबर दिला, या भानगडीत न पडता आम्ही सर्व कामगारांनी दुकान परिसरातून काढता पाय घेतला. कोणालाच विश्‍वास न बसल्यामुळे बीडच्या आम्हा 35 कामगारांपैकी कोणीही मंत्रालयात गेले नाही. आमच्याप्रमाणेच जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीचे मालक शरद जोशी यांना देखील विनायकराव मेटे यांचा फोन आला.

‘मी उद्या आमदार बनणार आहे.’ असे सांगितल्यानंतर ते मंत्रालयात गेले, असे कंपनीत कामाला गेल्यानंतर कळले पण विश्‍वास बसत नव्हता. दुसर्‍या दिवशी आमच्यापैकी कोणीतरी बाहेर गेला अन् हातात नवाकाळ पेपर घेऊन आला. धावत- पळतच तो खोलीवर आला. आपला विनायक खरच आमदार झाला, म्हणत त्याने पेपर दाखवला. बातमीची हेडींग होती, ‘अतिशय छोटया गावातील रंग काम करणार्‍या मुलाने घेतली आमदारकीची शपथ!’ यानंतर आम्ही सर्व कामगारांनी धावत चेतना किराणा स्टोअर्स गाठले. विनायक मेटे यांनी कोणता नंबर दिला, याची माहिती घेतली. त्या नंबरवर फोन केला असता जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीचे मालक शरद जोशी यांच्या घरचा तो नंबर असल्याचे समजले. सुरूवातीला जोशी यांनी आमदार मेटे यांचे बोलने हसण्यावारी घेतले होते. परंतु विनायक आमदार बनणार असल्याची खात्री पटताच त्यांनी त्यांना आपले घर रहायला दिले होते.

यानंतर आम्ही विनायक मेटे यांच्या शपथविधीच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली. विनायकराव यांच्यासारखा संघर्षशील, धाडसी, शून्यातून विश्‍व निर्माण करणारा माणूस पुन्हा होणे नाही. पुढे आमदार झाले तरी मेटे साहेबांतील सामान्य माणूस कायम होता. छोटी- छोटी कामे देखील ते करायचे, गोरगरीब माणसाचा फोन घ्यायचे. लहान कार्यकर्त्याला देखील मानसन्मान द्यायचे. निमंत्रण दिलं आणि मेटे साहेब आले नाहीत असं कधीच झालं नाही. असा हा तळागाळातील माणसाचा राजबिंडा नेता आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही.

आमदारकीच्या शपथविधीपुर्वी चार दिवस अगोदरपर्यंंत केली मजुरी

1979 ते 1995 असे 17 वर्षे मुंबईत रंग कामगार म्हणून काम करणारे विनायक मेटे यांनी 31 जानेवारी 1996 राजी आमदारकीची शपथ घेतली. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ते 25 जानेवारी 1996 पर्यंत ते रंग कामगार म्हणून काम करत होते. ते म्हणायचे मी आमदार होणार आहे, अन् सारे जण हसायचे. फोन करून सांगितले उद्या आमदार बनणार आहे, शपथविधीला या! कोणाचाच विश्‍वास बसला नाही, यामुळे सोबतच्या कामगार मित्रांपैकी कोणीच शपथविधीला गेले नाही. दुसर्‍या दिसशी नवाकाळमध्ये बातमी आली ‘अतिशय छोट्या गावातील रंग कामगार मुलाने घेतली आमदारकीची शपथ’ अन् सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

-तुकाराम धोंडीबा येळवे, मूळगाव कोटी, ता. केज, जि. बीड

-शब्दांकन : बालाजी तोंडे, बीड

हेही वाचा

Back to top button